हातकणंगलेतील टोप येथे अक्षता कलशाचा पालखी सोहळा उत्साहात!

सगळीकडे अक्षता कलशाचा सोहळा सगळीकडे अगदी उत्साहात साजरा होत आहे. टोप (ता. हातकणंगले) येथे अयोध्येतील राममंदिर मंगल अक्षता कलशाचा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. अयोध्यातून रामलल्ला प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी या मंगल अक्षता कलशाचे वाजत गाजत गावात आगमन झाले. सायंकाळी गावातून मुख्य मार्गातून मंगल कलश पालखी सोहळा झाला. प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचे व मंगल कलशाचे पुजन मौजे वडगावचे ज्योतिष भूषण प्रसाद स्वामी यांनी केले. त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात अक्षता कलशाची पालखी मारुती मंदिरातून बाहेर पडली.

पालखी मार्गावर ग्रामस्थांच्या वतीने सडा, रांगोळी काढण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा महिलांनी व ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करत दर्शन घेतले. मंगल कलश पालखी श्री कल्लेश्वर मंदिर, महालक्ष्मी मंदिर, विठ्ठल मंदिर, बिरदेव मंदिर या मंदिरात आरती करत परिसरातून प्रदक्षिणा घालत गावात मुख्य चौकातून पार पडली. यावेळी रामभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.