प्रत्येक सकाळी आपण आरोग्य चांगलं राहावं म्हणून अनेक गोष्टी करतो. काही लोक चालायला जातात, काही योगाभ्यास करतात तर काही ध्यानधारणा करतात. पण एक साधीशी कृती जी आपल्या आरोग्यासाठी चमत्कार घडवू शकते, ती बहुतेकांच्या लक्षातही येत नाही. सकाळच्या वेळेस वातावरण प्रसन्न असतं, हवा शुद्ध असते आणि जमिनीवर ओलसरपणा जाणवतो. याच वेळी काही मिनिटे गवतावर अनवाणी पायाने चालल्यास शरीरावर त्याचे अनोखे परिणाम दिसून येतात.
विशेष म्हणजे ही कृती कोणत्याही औषधोपचाराशिवाय शरीरातील अनेक तक्रारींवर परिणामकारक ठरू शकते. यामुळे मनःशांती लाभते, झोप सुधारते, रक्ताभिसरण सुरळीत होते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. इतकंच नव्हे तर मानसिक तणावापासूनही आराम मिळतो. म्हणूनच योगा एज्युकेटर सेजल शहा हे उपाय दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्याचा सल्ला देतात.
निसर्गाशी थेट संपर्क साधला की शरीराला वेगळी ऊर्जा मिळते. सकाळच्या थंड गारव्यात गवतावर अनवाणी पायाने चालल्यास शरीराला सूक्ष्म इलेक्ट्रॉन्स मिळतात, ज्याचा परिणाम पेशींवर होतो. हे इलेक्ट्रॉन्स जळजळ कमी करण्यास मदत करतात आणि शरीरातील ऊर्जेचा समतोल राखतात. फक्त १५ ते २० मिनिटे असा संपर्क साधला तरी शरीर ताजेतवाने वाटू लागतं आणि दैनंदिन कामांसाठी लागणारी ताकद नैसर्गिकरित्या मिळते.
आपल्या शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती बळकट असणं आवश्यक आहे. सकाळच्या वेळेस गवतावर अनवाणी पायाने चालल्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि इलेक्ट्रॉन्स इन्फ्लेमेशन कमी करतात. परिणामी शरीरातील प्रतिकारक पेशी सक्रिय होतात. हेच कारण आहे की अशा पद्धतीने चालणारे लोक वारंवार आजारांना बळी पडत नाहीत. दीर्घकाळ या सवयीचा अवलंब केल्यास ऑटोइम्युन रोगांपासूनही संरक्षण मिळतं.
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला तणाव असतो. पण थोडं शांत बसून किंवा निसर्गात फिरून तो कमी करता येतो. गवतावर अनवाणी पायाने चालल्याने पायातील प्रेशर पॉइंट्स उत्तेजित होतात, ज्यामुळे मेंदूतील ताण कमी होतो. ताजी हवा फुफ्फुसात भरल्याने मन प्रसन्न होतं आणि चिंतेची भावना कमी होऊ लागते. दिवसाची सुरुवात अशा प्रकारे केल्यास दिवसभर सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. गवतावर अनवाणी चालल्याने ६२% स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. गवताचा हिरवा रंग मनाला शांत करण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतो. पहाटेच्या उन्हात भिजत भिजत गवतावर अनवाणी चालणे इंद्रियांना पुनरुज्जीवित करण्यास मदत करते.
रक्ताभिसरण आणि हृदय आरोग्य सुधारते
गवतावर अनवाणी पायाने चालणं हे शरीरासाठी एक प्रकारचं नैसर्गिक मसाज असतं. त्यामुळे रक्ताभिसरण वेगाने होऊ लागतं. जेव्हा रक्तप्रवाह योग्य प्रमाणात चालतो तेव्हा शरीराच्या प्रत्येक अवयवाला पुरेसं ऑक्सिजन मिळतं. याचा थेट फायदा हृदयाच्या आरोग्यावर होतो. नियमित सराव केल्यास हृदय बळकट राहतं आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. अशाप्रकारे ही साधी कृती दीर्घकाळ आरोग्याची हमी देते.
