अख्ख्या स्पर्धेत हा भारतीय एकच बॉल खेळला; पण तोच फटका ऐतिहासिक ठरला

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय मिळवत नवव्यांदा आशिया कपचं विजेतेपद आपल्या नावावर केलं. या सामन्यातील सर्वात मोठं आकर्षण ठरलं ते रिंकू सिंहचं ! ज्याने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना खेळला नव्हता, पण फायनलमध्ये आलेल्या एका चेंडूवर चौकार ठोकत भारताला किताब मिळवून दिला.

स्पर्धेतील एकही सामना न खेळलेला रिंकू सिंह अंतिम लढतीत पहिल्यांदाच मैदानात उतरला आणि पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजयी केलं. सामना संपल्यानंतर एक्स्ट्रा इनिंग्स या कार्यक्रमात रिंकूला विचारलं की तो “God’s Plan” वर विश्वास ठेवतो का? त्यावर त्याने होकार देत सांगितलं की, “हो, मला वाटतं सगळं आधीच लिहिलेलं असतं.” त्यानंतर त्याला एक पेपर दाखवण्यात आला, ज्यावर त्याने स्पर्धा सुरू होण्याआधीच लिहिलं होतं की, “मी विनिंग शॉट खेळेन.” त्याचं हे भाकीत अंतिम लढतीत खऱ्या अर्थाने साकार झालं.

भारताला विजयासाठी केवळ एका धावांची गरज असताना रिंकू मैदानावर आला. हारिस रऊफच्या चेंडूवर मिड ऑनच्या वरून ठोकलेला चौकार संपूर्ण स्टेडियममध्ये उत्साहाची लाट निर्माण करून गेला. केवळ एका चेंडूत खेळलेली ही खेळी त्याला कायमसाठी इतिहासात कोरून गेली.

विजय मिळाल्यानंतर रिंकू सिंहने आपल्या मंगेतर प्रिया सरोजसोबत व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. हा आनंदाचा क्षण प्रिया सरोजने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत चाहत्यांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे मैदानावरील विजय आणि वैयक्तिक आनंद अशा दोन्ही आघाड्यांवर रिंकू सिंहचा दिवस बेस्ट ठरला. आशिया कप 2025 च्या विजयाने भारताने पुन्हा एकदा या स्पर्धेतील आपलं वर्चस्व सिद्ध केलं. मात्र, यंदाच्या फायनलचं नाव घेता रिंकू सिंहचा तो एक चौकार कायम लक्षात राहील, कारण त्याने एका चेंडूत इतिहास रचला आणि आपल्या संघाला ‘चॅम्पियन’ बनवलं.