टीम इंडियाच्या विजयानंतर अमिताभ बच्चन यांनी पाकिस्तानी क्रिकेटरला केलं ट्रोल

क्रिकेटची कोणतीही टुर्नामेंट असली तरी जेव्हा कधी भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना असतो, तेव्हा मैदानावर हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळतोच. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातही असंच काहीसं पहायला मिळालं. आधीच दोन वेळा भारताने पाकिस्तानच्या संघाला धूळ चारली होती आणि अंतिम सामन्यातही काही वेगळं पहायला मिळालं नाही. भारताने अत्यंत सहजतेने पाकिस्तानला हरवलं आणि 41 वर्षांच्या इतिहासात नवव्यांदा आशिया कप आपल्या नावे केला. या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. याशिवाय बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनीही खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव केला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हेसुद्धा क्रिकेटप्रेमी आहेत. भारताच्या विजयानंतर टीमला शुभेच्छा देताना त्यांनी एका माजी पाकिस्तानी क्रिकेटरची आपल्याच अंदाजात फिरकी घेतली. बिग बींची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एका मुलाखतीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने अभिषेक शर्माचा उल्लेख चुकून अभिषेक बच्चन असा केला होता. याचं उत्तर त्यावेळी अभिषेकनेही दिलं होतं. परंतु आता आशिया कप जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी शोएब अख्तरला ट्रोल केलं आहे. बिग बींनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ट्विट करत लिहिलं, ‘अभिषेक बच्चन खूप चांगला खेळला. तिथे जीभ अडखळली आणि इथे बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग न करताच शत्रूला अडखळवलं. जय हिंद, जय भारत, जय माँ दुर्गा.’ या पोस्टमध्ये बिग बींनी जाणूनबुजून अभिषेक शर्माचा उल्लेख अभिषेक बच्चन असा केला. त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कुलदीप यादवच्या फिरकी गोलंदाजीनंतर तिलक वर्माने साकारलेल्या झुंजार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला आणि आशिया चषक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद पटकावलं.