मुंबईत दिवाळीमध्ये ५८६ घरांसाठी लॉटरी निघणार

मुंबईत घर घेणे म्हणजे आता आवाक्याच्या बाहेर गेलं आहे. त्यामुळं अनेकजण म्हाडाच्या लॉटरीवर अवलंबून असतात. मात्र आता म्हाडा नव्हे तर मुंबई महानगरपालिका घरांसाठी लॉटरी काढणार आहे. मुंबईतील्या भूखंडावरील प्रकल्पातील पालिकेला 800 घरे मिळणार आहेत. त्यातील 586 घरांसाठी पालिका दिवाळीत लॉटरी काढणार आहे.

विकास नियंत्रण नियमावली 15 अंतर्गत चार हजार चौरस फुटांपेक्षा मोठ्या भूखंडांवरील निवासी प्रकल्पातून मुंबई महापालिकेला 800 घरे मिळाली आहेत. या घरांचा ताबा पालिकेला मिळाला असून, त्यापैकी 586 घरांची येत्या दिवाळीत लॉटरी काढली जाणार आहे. तर, उर्वरित 214 घरे प्रकल्पग्रस्तांसाठी (पीएपी) ठेवली जाणार आहेत. दरम्यान, लॉटरीसाठीच्या 586 पैकी 186 घरांसाठी मंजुरी मिळाली असून, आठवडाभरात उर्वरित घरांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईत चार हजार चौरस फुटांपेक्षा भूखंडांवरील निवासी मोठ्या बांधकामांतून उपलब्ध होणाऱ्या 80 टक्के घरांची विकासकांकडून विक्री केल्यानंतर किमान 20 टक्के घरे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून द्यावी लागतात. ही घरे संबंधित प्राधिकरणाला मोफत देणे अपेक्षित असते. परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढवणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरे उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा हेतू आहे.

ही योजना मुंबईसह राज्यातील 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका क्षेत्रांतील मोठ्या प्रकल्पांना लागू होते. परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढवणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरे उपलब्ध करून देणे, या योजनेचा हेतू असल्याचं पालिकेने म्हटलं आहे.

अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना 800 पैकी 586 घरे येत्या दिवाळीत लॉटरीद्वारे विकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तर मुंबईत विविध विकास प्रकल्पांमध्ये बाधित प्रकल्पग्रस्तांसाठी उर्वरित 214 घरे राखीव ठेवली जाणार आहेत.