“स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत !” या दमदार घोषणेनं महाराष्ट्रात एका विलक्षण चित्रपटाची चाहूल लागली आहे. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट येत्या 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आजवर कधीच दिसलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप यात दिसणार असून मराठीची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचं मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक विषयांवर महाराजांचं भाष्य आणि कृती यातून बघायला मिळणार आहे.
या चित्रपटात सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असून त्यांच्या सोबतीला विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री अशी कलाकारांची तगडी फौज आहे. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा – पटकथा महेश मांजरेकर यांची असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी केली असून प्रस्तुती झी स्टुडिओजची आहे. हा चित्रपट केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव न करता, आजच्या महाराष्ट्राशी आणि त्याच्या अनुत्तरित प्रश्नांशी संवाद साधत असल्याचे टीझरवरून कळतेय.
याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, “माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाशी भिडण्याचा प्रयत्न आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांनी केवळ स्वराज्य उभं राहिलं नाही, तर एक जनमानस जागृत झाले. आजच्या पिढीपुढे असलेल्या प्रश्नांकडे पाहाताना, त्याच विचारांचा प्रकाश पडद्यावर आणायचा आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा प्रवास इतिहास सांगणारा असेलच, त्याचबरोबर वर्तमानाला प्रश्न विचारणारा, त्याला जागवणारा आणि दिशा दाखवणारा ठरेल. कलाकार म्हणून मी गप्प बसू शकत नाही आणि हा सिनेमा माझ्या अस्वस्थतेचा, माझ्या जिव्हाळ्याचा आवाज आहे.”
झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, “झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे समीकरण कायमच यशस्वी राहिलेलं आहे. मराठीसाठी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा केवळ एक चित्रपट नसून महाराष्ट्राच्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी पुन्हा नातं जोडणारा प्रवास आहे. या चित्रपटाशी जोडल्या गेल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. या चित्रपटातून महाराज बोलणार आहेत, त्यामुळे हा चित्रपट बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी नसून जगण्याचा प्रयत्न करण्यास भाग पाडणारा आहे.”
