अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणावर सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान

आज विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करत आहे. आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी झाली होती. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नागपुरातील रेशमबाग मैदानात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात २१ हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. या शताब्दी वर्ष सोहळ्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात आयोजित विजयादशमी उत्सव कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्यांना नमन केले. संघ प्रमुख मोहन भागवत आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विजयादशमी २०२५ च्या निमित्ताने शस्त्र पूजन केले. या विजयादशमी उत्सवात घाना, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, यूके, यूएसए यांसारख्या विविध देशांतील अनेक विदेशी पाहुणे देखील सहभागी झाले आहेत.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नागपुरातील रेशमबाग मैदानातून संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या संबोधनात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य केले. यंदाचे वर्ष श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या बलिदान वर्षाचे आहे. अन्याय आणि अत्याचारातून समाजाला मुक्ती देण्यासाठी हिंद की चादर बनून बलिदान देणाऱ्या या महान व्यक्तीचे या वर्षात स्मरण केले जाईल, असे मोहन भागवत म्हणाले. त्यासोबतच यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या योगदानावरही भाष्य केले. आज गांधी जयंती देखील आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर देशाची व्यवस्था कशी असावी याबद्दल विचार देणाऱ्यांमध्ये गांधीजींचे योगदान अविस्मरणीय आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

यावेळी मोहन भागवत यांनी अमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणाचा उल्लेख केला. “अमेरिकेने जे नवीन टॅरिफ धोरण लागू केले आहे, त्याचा फटका सर्वांना बसत आहे. त्यामुळेच जगात परस्पर संबंध निर्माण करणे आवश्यक आहे, कारण आपण एकटे जगू शकत नाही. पण ही निर्भरता नाईलाज बनू नये. त्यामुळे आपल्याला या गोष्टीला मजबुरी न बनवता, आत्मनिर्भर होऊन स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकले पाहिजे”, असे मत त्यांनी व्यक्त केले.