मध्य प्रदेशात दुर्गामातेच्या विसर्जनादरम्यान गुरुवारी झालेल्या दोन दुर्घटनांमध्ये जवळपास 13 जणांचा मृत्यू झाला. दुर्दैवी बाब म्हणजे यामध्ये दहा मुलांचा समावेश आहे. उज्जैनजवळील इंगोरिया भागात, एका 12 वर्षीय मुलाने चुकून इग्निशन चालू केल्यामुळे भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर-ट्रॉलीसह रेलिंगवरून कोसळून चंबळ नदीत पडला. मुलाने ट्रॅक्टर सुरु केल्याने तो पुढे गेला आणि दुर्घटना घडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मुलं पाण्यात पडली होती. दरम्यान स्थानिक रहिवाशांना फक्त 11 जणांना बाहेर काढता आले. एका मुलाचा मात्र शोध लागला नाही. बचावलेल्यांपैकी दोन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकांनी बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी नदीकाठच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली आणि क्रेनने वाहन बाहेर काढलं.
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत खंडवा जिल्ह्यातील पंधना तहसीलमध्ये, अर्दला आणि जमली येथील 20 ते 25 ग्रामस्थ विसर्जनासाठी जात असताना त्यांचा ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात उलटला. अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढले आहेत. मृतांमध्ये आठ मुलींचा समावेश आहे आणि आणखी काही जण बेपत्ता असण्याची शक्यता आहे. तलावात बुडालेल्यांचा शोध घेतला जात असताना ट्रॉली पाण्यातून बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॉली प्रमाणापेक्षा जास्त भरलेली दिसत होती. ही ट्रॉली तलावात उलटली. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला असून या घटना अत्यंत दुःखद असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात त्वरित उपचार देण्याचे निर्देश दिले.
