कफ सिरपमुळे 11 बालकांचा मृत्यू, आतापर्यंतच्या तपासात आढळलं ते फारच धक्कादायक !

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. संशयित कफ सिरप सेवनामुळे लहान मुलांच्या मृत्यूची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. सुरुवातीला सर्दी-खोकल्याच्या सामान्य तक्रारींसाठी दिलेल्या या औषधाने मुलांच्या मूत्रपिंडावर परिणाम झाला आणि जीवघेणी स्थिती निर्माण केली. तामिळनाडूच्या प्रयोगशाळेत यासंदर्भातील अहवाल तयार झाला. आतापर्यंतच्या तपासात नेमकं काय आढळलं? सविस्तर जाणून घेऊया.

छिंदवाडा जिल्ह्यात 7 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या संकटाने एका महिन्यात 11 लहान मुलांना गिळंगृत केले. यातील बहुतेक मुले पाच वर्षांखालील असून, सौम्य ताप आणि खोकल्यावर स्थानिक वैद्यकीय केंद्रांमधून कोल्ड्रिफ कफ सिरप दिला गेला. सुरुवातीला हे मौसमी आजार वाटले, पण नंतर मुलांची प्रकृती अचानक बिघडली. बायोप्सी अहवालानुसार, टॉक्सिनमुळे मूत्रपिंडाचे अपयश झाले, ज्यामुळे रक्तदाब, उलटी आणि श्वासकष्टासह जीवघेणी लक्षणे दिसली. सध्या 13 मुलांवर उपचार सुरु असून नागपूर आणि अलीगढ येथील रुग्णालयांमध्ये त्यांचे निरीक्षण सुरू आहे. ही घटना ऑगस्टच्या अखेरीस सुरू झालीय.

तामिळनाडू ड्रग कंट्रोल विभागाकडून ४ ऑक्टोबरला मिळालेल्या अहवालाने खळबळ उडवली. कोल्ड्रिफ सिरपच्या नमुन्यात (बॅच क्र. एसआर-१३) ४८.६ टक्के डायथिलीन ग्लायकोल (डीईजी) आढळले, जे अँटीफ्रीज आणि ब्रेक फ्लुइडमध्ये वापरले जाणारे घातक रसायन आहे. हे पदार्थ गिळल्यास मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू होतो. मध्य प्रदेश फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (एमपीएफडीए) १३ नमुन्यांची चाचणी केली, ज्यातून सिरपची भेसळ उघड झाली. केंद्रीय ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) ने सहा राज्यांमध्ये जोखीम-आधारित तपास सुरू केला असून, कफ सिरप, ताप निवारक आणि अँटीबायोटिक्सच्या इतर नमुन्यांचा अभ्यास चालू आहे. नागपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीनेही पाणी आणि इतर घटकांची तपासणी केली, पण प्राथमिक अहवाल सामान्य आहेत.

छिंदवाडा पोलिसांनी पारसिया येथील बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी यांना अटक केली. त्यांनी सर्दीग्रस्त मुलांना कोल्ड्रिफची शिफारस केली होती, ज्यामुळे अनेक कुटुंबे दुःखात बुडाली. डॉ. सोनींवर औषध व प्रसाधन कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला. तामिळनाडूतील श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीच्या संचालकांवरही एफआयआर नोंदवली गेली. एमपीएफडीएने सर्व जिल्हा निरीक्षकांना विद्यमान साठा जप्त करण्याचे आणि विक्री रोखण्याचे आदेश दिले. केरळ आणि तामिळनाडूतही कोल्ड्रिफवर बंदी आली असून, कंपनीच्या इतर १९ औषधांवरही निर्बंध लादले गेले. राजस्थानमध्येही ड्रग कंट्रोलरला निलंबित करण्यात आले.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करून दुःख व्यक्त केले. छिंदवाड्यातील कोल्ड्रिफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू अत्यंत वेदनादायी असल्याचे ते म्हणाले. त्यांनी प्रत्येक मृत मुलाच्या कुटुंबाला ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली, तर आजारी मुलांच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलेल, असे आश्वासन दिले. यादव सरकारने तात्काळ बैठकीत कारवाईचा धडाका लावला, ज्यात कंपनीला उत्पादन थांबवण्याचे आणि स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.

ही घटना राजस्थान (भरतपूर आणि सीकरमध्ये दोन मृत्यू) आणि इतर भागांत पसरली असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारीचा इशारा दिला. सीडीएससीओने सहा राज्यांमध्ये औषध उत्पादन केंद्रांची तपासणी सुरू केली, ज्यात आयआयएमआर, एनआयव्ही आणि एनआयईआरआयच्या तज्ज्ञांचा समावेश आहे.