अक्षय कुमारचा मराठी चित्रपटासाठीचा ‘कानमंत्र’ अमलात आणणार

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या विशेष कार्यक्रमात बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमनेसामने आले. या मुलाखतीदरम्यान मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड इंडस्ट्री विकास आणि तरुणाईपर्यंत मराठी चित्रपट पोहोचवण्याबद्दल सविस्तर चर्चा झाली. या मुलाखतीदरम्यान अक्षय कुमारने मुख्यमंत्र्यांना विचारलेला एक प्रश्न आणि त्यावर फडणवीस यांचं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला, ‘मी स्वतः मराठी चित्रपटांचा फॅन आहे. या चित्रपटांची स्टोरी, संस्कृती आणि भावनिक बाजू वेगळी असते. पण तरुणाईत, विशेषतः झेन-जी पिढीत मराठी चित्रपट कसे लोकप्रिय करता येतील? यासाठी काही ठोस योजना आहे का? असा प्रश्न अक्षयने फडणवीस यांना विचारला असता त्यावर फडणवीस म्हणाले, ‘मराठी चित्रपट इतकी शक्तिशाली आहेत कारण त्यांना मराठी थिएटरचा भक्कम पाया मिळाला आहे. देशातील अनेक भाषिक रंगभूमी लयाला गेली पण मराठी थिएटर आजही जिवंत आहे. इनोव्हेटिव्ह आहे. मराठी प्रेक्षक व्हायब्रंट आहेत. आजही अनेक नाटकं हाऊसफुल्ल होतात. काही कलाकारांनी तर 10 हजार नाट्यप्रयोगांचा विक्रम केला आहे. हीच मराठी सिनेमाची खरी ताकद आहे.

यामध्ये ‘नटरंग’, ‘दशावतार’, ‘सखाराम बाइंडर’ यांसारखे चित्रपट मराठी समाजाच्या सर्जनशीलतेचे उत्तम उदाहरण आहेत. मराठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळं भावविश्व आहे आणि त्यामुळे मराठी चित्रपट सतत विकसित होत आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी जुने दिवस आठवत सांगितले की, ‘एकेकाळी मराठी चित्रपटांना थिएटर मिळणं अवघड होतं. मोठे हिंदी ब्लॉकबस्टर चित्रपट आल्यावर मराठी चित्रपटांचे शो रद्द व्हायचे. पण आता परिस्थिती बदलली आहे. आज दोन मराठी चित्रपट एकाच वेळी रिलीज होतात आणि दोन्हीही यशस्वी ठरतात. हे मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी मोठं यश आहे. यासोबत फडणवीस यांनी यावेळी सरकारकडून मराठी चित्रपटसृष्टीसाठी अधिक सहाय्य देण्याचे आश्वासनही दिलं. सरकार म्हणून आम्ही मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीला आवश्यक ती मदत नक्कीच करणार आहोत असं ते म्हणाले.

अक्षय कुमारच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, ‘आम्ही आतापर्यंत झेन जी पिढीसाठी खास प्रयत्न केले नव्हते. पण आज अक्षय कुमारने एक चांगला मंत्र दिला. नवी पिढी मराठी चित्रपटांशी जोडली गेली पाहिजे. हा मंत्र मी गंभीरपणे घेतो आणि त्यावर काम करणार आहे असं देखील ते यावेळी म्हणाले.