‘या’ भारतीय शहराची संपूर्ण अर्थव्यवस्था चालते मिरच्यांवर ! तुम्हाला माहित आहे का चिली सिटीचे खरे नाव ?

भारताचं असं एक शहर आहे, जिथं संपूर्ण अर्थव्यवस्था “मिरची”वर चालते ! या शहराला “Chilli City” म्हणूनही ओळखलं जातं आणि त्याचं नाव आहे गुंटूर , आंध्र प्रदेशातील एक प्रसिद्ध जिल्हा. भारतामध्ये प्रत्येक शहराची स्वतःची ओळख असते कुठं ऐतिहासिक वारसा तर कुठं निसर्गसौंदर्य. पण गुंटूरचं वैशिष्ट्य थोडं वेगळं आहे. हे शहर पूर्ण जगभर मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. इथे उगवली जाणारी मिरची केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही तिच्या रंग, सुगंध आणि तीखट चवीसाठी ओळखली जाते.

आंध्र प्रदेशातील या जिल्ह्याचं नाव घेताच मनात लाल रंग आणि झणझणीतपणा येतो. इथल्या मातीतले खनिज घटक, अनुकूल हवामान आणि खास प्रजातींमुळे गुंटूर मिरची अत्यंत उच्च दर्जाची मानली जाते. या मिरचीचा रंग गडद लाल आणि चव अत्यंत झणझणीत असते. यात कॅप्साइसिन चं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे हिची तीव्रता 35,000 ते 40,000 Scoville Heat Units पर्यंत पोहोचते, जी सामान्य मिरचीपेक्षा दहा पट जास्त आहे. गुंटूर मिरचीची मागणी केवळ भारतात नाही तर चीन, अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्व या देशांमध्येही प्रचंड आहे. या मिरचीचा वापर सॉस, लोणचं, आणि रेड चिली पावडर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारत हा जगातील सर्वात मोठा मिरची उत्पादक आणि निर्यातक देश आहे, आणि या उद्योगात गुंटूरची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. वर्ष 2020-21 मध्ये गुंटूर जिल्ह्यातून जवळपास ₹8,430 कोटींच्या मिरचीची निर्यात झाली होती, जी भारताच्या एकूण मिरची निर्यातीच्या निम्म्याहून अधिक होती. गुंटूर जिल्ह्यातील जमिनीत असलेले नैसर्गिक खनिज घटक आणि हवामान मिरचीच्या रंग-चवीला एक वेगळाच ठसा देतात. इथं उगवणाऱ्या 334 मिरची प्रजाती प्रीमियम क्वालिटीच्या मानल्या जातात. या मिरचीचा गडद लाल रंग आणि तीव्र सुगंध तिला इतर सर्व मिरच्यांपासून वेगळं ठरवतो. घरगुती बाजारपेठ असो वा परदेशातील मागणी, गुंटूर मिरचीने भारताला “Spice Capital of India” म्हणून जागतिक ओळख मिळवून दिली आहे. गुंटूर मिरची फक्त एक मसाला नाही ती संपूर्ण जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेची, आणि हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेची रीढ आहे. म्हणूनच गुंटूरचं नाव आज जगभरात अभिमानाने घेतलं जातं “Chilli City of India” म्हणून.