इचलकरंजी, वीज कंपन्यांमधील खासगीकरणाविरोधात सोमवारी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्यावतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदील यांच्या दालनात दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शासन, प्रशासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास ९ ऑक्टोबरनंतर तीन दिवस लाक्षणिक संप आणि तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. या आंदोनाचा महावितरणच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले. आंदोलनात १५० हुन अधिक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने वीज कंपन्यांमधील खासगी करणाच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून कृती समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे आपत्कालीन तांत्रिक सेवा वगळता सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प होते. या आंदोलनामुळे कार्यकारी अभियंता आंदोलकांसमोर खुर्चीत बसून होते. यावेळी आंदोलकांनी वीज कंपन्यांतील खाजगीकरण, चुकीची पुनर्रचना, पेन्शन लागू करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत समाविष्ट करणे, मागासवर्गीयांना पदोन्नतीतील आरक्षण लागू करणे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनाची शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास ९ ऑक्टोबरनंतर ३ दिवस लाक्षणिक संप आणि तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
