टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा वनडे संघाचं कर्णधारपद गमावल्यानंतर पहिल्यांदाच पब्लिक इव्हेंटमध्ये दिसला. मंगळवारी (7 ऑक्टोबर) मुंबईत झालेल्या सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार समारंभात त्याला खास सन्मान देण्यात आला. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयासाठी रोहितला विशेष स्मृतीचिन्ह देण्यात आलं. मात्र, या वेळी त्याने त्या विजयाचं श्रेय सध्याचे कोच गौतम गंभीर ला न देता माजी कोच राहुल द्रविड ला दिलं आणि याच वक्तव्यावरून नवा वाद पेटला आहे.
पुरस्कार स्वीकारताना रोहित म्हणाला,“भारताच्या अलीकडच्या विजयांचं श्रेय फक्त खेळाडूंना नाही, तर राहुल भाईंच्या काळात सुरू झालेल्या मेहनती आणि विचारसरणीला जातं. 2023 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभवानंतर आम्ही हार मानली नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आता काहीतरी वेगळं करायचं. त्याच मेहनतीचं फळ म्हणजे 2024 चा टी20 वर्ल्ड कप आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय.”
या विधानानंतर चाहत्यांमध्ये चर्चा रंगली की, रोहितने जाणीवपूर्वक गंभीरचं नाव टाळलं का? कारण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताना टीमचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड नव्हता, तर गौतम गंभीर होता.
रोहित पुढे म्हणाला, “मला ती टीम खूप आवडते. त्यांच्या सोबत खेळणं एक वेगळा अनुभव होता. ही फक्त एक-दोन वर्षांची मेहनत नव्हती, तर अनेक वर्षांचा प्रवास होता. आम्ही अनेक वेळा ट्रॉफीच्या जवळ पोहोचलो पण फिनिश करू शकलो नाही. मग आम्ही ठरवलं काहीतरी बदल करायला हवं. विचार पुरेसा नसतो, तो प्रत्यक्षात आणायला लागतो, आणि ते फक्त एका-दोन खेळाडूंनी शक्य नाही. संपूर्ण टीमने ती विचारसरणी स्वीकारली आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रत्येकाने स्वतःला आव्हान दिलं.”
रोहितने पुढे सांगितलं की, “पहिलं सामना जिंकल्यानंतर आम्ही लगेच पुढच्या मॅचवर लक्ष केंद्रित केलं. 2024 टी20 वर्ल्ड कपसाठी योजना आखताना माझ्या आणि राहुल भाईंच्या त्या दृष्टिकोनाने आम्हाला मदत केली. तीच पद्धत आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत कायम ठेवली.”
रोहितकडून जेव्हा वनडे कर्णधारपद गमावण्याबद्दल विचारलं, तेव्हा त्याने शांतपणे उत्तर दिलं, “मी नेहमी तीनही फॉर्मॅटमध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा मी स्वतःला सिद्ध केलं. काही इतर खेळाडूंनीही तसंच केलं, आणि त्यामुळे संपूर्ण टीमचा आत्मविश्वास वाढला. मला ऑस्ट्रेलियात खेळायला नेहमी आवडतं ती मोठी स्पर्धा असते आणि तेथील लोक क्रिकेटवर मनापासून प्रेम करतात.”
रोहितच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये आणि क्रिकेट सर्कलमध्ये नवी चर्चा सुरू झाली आहे. “रोहितकडून वनडे कर्णधारपद जबरदस्तीने काढून घेतलं का?” कारण त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीचा क्रेडिट गंभीरऐवजी द्रविड़ला दिल्यानंतर अनेकांना असं वाटतं की ‘हिटमॅन’ अजूनही आपल्या जुन्या कोचच्या कामाचा सन्मान करतो आणि नवीन व्यवस्थापनाबद्दल काहीसं नाराजही आहे.
