मुंबईकरांना दिवाळीपूर्वी मोठा खोळंबा! मध्य रेल्वेने 30 तासांचा मेगाब्लॉक

दिवाळीचा सण अवघ्या आठवड्याभरावर आला असून मुंबईकरांचा सणासाठी खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र याच मुंबईकरांना आता मोठा त्रास सहन करावा लागून शकतो , कारण मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या मध्य रेल्वेवर आज तब्बल 30 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या मेगा ब्लॉकमुळे कर्जत ते नेरळ आणि कर्जत ते खोपोली सर्व लोकल बंद राहणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या आधीच्या वीकेंडलाच मुंबईकरांचा खोळंबा(delays)होणार असून मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

मध्य रेल्वेवर आज तीस तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येईल. या काळात कर्जत ते नेरळ आणि कर्जत ते खोपोली सर्व लोकल बंद राहतील. तसेच नेरळ पासून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकसेवादेखील उशिराने धावणार आहे. उद्या, म्हणजेच रविवारी, 12 ऑक्टोबररोजी ब्लॉक नंतर संध्याकाळी 7 वाजून 43 मिनिटांनी कर्जत ते सीएसएमटी ही पहिली लोकल कर्जत येथून सुटेल.

मेगा ब्लॉकचा पुणे-मुंबई मार्गावर मोठा परिणाम होणार आहे. कर्जत यार्ड पुनर्रचना कामासाठी 11 ते 14 ऑक्टोबरदरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. चार दिवस मुंबई-पुणे मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच शॉर्ट टर्मिनेट आणि डायव्हर्टही करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रगती, डेक्कन क्वीन, इंद्रायणी, इंटरसिटीसह वंदे भारत एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे.

नेरळ ते कर्जत आणि कर्जत ते खोपोली लोकल सेवा रद्द!

कर्जत, खोपोली, नेरळ, बदलापूर आणि अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेशन आणि ओरिजिनेशन, त्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. काही एक्सप्रेस गाड्या कल्याणमार्गे आणि काही दौंडमार्गे वळवण्यात आल्या आहेत. या कालावधीत प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी रेल्वे वेळापत्रक तपासावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सुरक्षिततेसाठी देखभाल आवश्यक असल्याचे सांगत, प्रवाशांची गैरसोय झाल्यास दिलगीर आहोत, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.