टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यानंतर आता तिसरा सामना हा 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी बीसीसीआयने उर्वरित 3 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. टीममध्ये केएल राहुल आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजा यांची एन्ट्री झाली आहे. मात्र या दोघांना खेळण्यासाठी आधी फिटनेस सिद्ध करावी लागेल.
दोन्ही संघांसाठी हा मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप साखळीच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाची आहे. ही मालिका जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. मात्र टीम इंडियाला घरात पराभूत करणं इंग्लंडसाठी सोपं नसेल. ही मालिका कोण जिंकणार याबाबत माजी क्रिकेटर इयन चॅपेल यांनी भविष्यवाणी केली आहे. चॅपेल नक्की काय म्हणाले हे जाणून घेऊयात.
“बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील टीम ही जो रुट याच्या कॅप्टन्सीतील इंग्लंड टीमपेक्षा फार वेगळी आहे, जी टीम गेल्या वेळेस स्पिनसमोर ढेर झाली होती”, असं इयन चॅपेल यांनी म्हटलं. इंग्लंड 2021 साली भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हा जो रुट हा इंग्लंडचा कर्णधार होता. इंग्लंडला तेव्हा पहिल्या सामना जिंकल्यानंतरही मालिका गमवावी लागली होती.