बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक असलेला फिल्मफेअर पुरस्कार 2025 गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडला आहे. 70 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शाहरुख खानपासून काजोल आणि करण जोहरपर्यंत, जवळजवळ प्रत्येक प्रसिद्ध चित्रपट कलाकार फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होता. आता, पुरस्कार विजेत्या कलाकारांची नावे समोर येऊ लागली आहेत, ज्यामध्ये ‘किल’ आणि ‘लापता लेडीज’ चे कलाकार आघाडीवर आहेत. तर, चला तर मग जाणून घेऊयात कोणाला कोणता पुरस्कार मिळाला.
मराठी अभिनेत्री छाया कदमला नुकताच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी मोठा पुरस्कार मिळाला आहे. ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील तिच्या प्रभावी भूमिकेसाठी तिला 70 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 2025 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा (महिला) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
‘लापता लेडीज’ या चित्रपटात छाया कदमने साकारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. तिच्या अभिनयातील भावनांची खोली आणि वास्तववादी सादरीकरणामुळे तिला केवळ प्रेक्षकांची दाद नाही तर समीक्षकांचंही कौतुक मिळालं.
फिल्मफेअर पुरस्कारांव्यतिरिक्त छाया कदमला याच चित्रपटासाठी आणि इतर मराठी चित्रपटांतील तिच्या अप्रतिम कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल तिला ‘म.टा. सन्मान’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे
छाया कदम ही तिच्या दमदार अभिनयशैलीसाठी ओळखली जाते. तिने आतापर्यंत मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नटरंग’, ‘आर्टिकल 370’ आणि ‘लापता लेडीज’ सारख्या चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांकडून छाया कदमवर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशाने मराठी कलाविश्वाला अभिमान वाटावा असं नक्कीच आहे.
