राज्याच्या महसूल विभागाकडून मुंबईकरांसाठी खास दिवाळी भेट

महसूल विभागाने खास मुंबईकरांसाठी दिवाळीची भेट दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करु शकतील. क्षेत्रीय मर्यादेची अट आता रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळं मुंबईकरांचा उलटा फेरा वाचणार आहे.

महसूल विभागाचा निर्णय काय?
मुंबई व मुंबई उपनगरातील नागरिक, व्यावसायिक व कंपनी मालक आपल्या क्षेत्रासहित मुंबईतील कोणत्याही सहा मुद्रांक कार्यालयातही दस्त नोंदणी करू शकतील. ज्या भागातील रहिवासी किंवा व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत, तेथीलच मुद्रांक कार्यालयात नोंदणी करण्याची अट काढून टाकण्यात आली आहे.

आता मुंबई शहर व उपनगरातील नागरिकांना कोणत्याही मुद्रांक कार्यालयात म्हणजे बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर तसेच ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी (अंमलबजावणी एक व दोन) या सहा कार्यालयांत मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल. या सुधारणेमुळे मुंबईकरांचा वेळ, धावपळ वाचेल. निर्णय प्रक्रिया व कार्यालयीन कामकाज जलद होईल. बुधवारी या निर्णयाचे शासन राजपत्र जारी करण्यात आलं आहे.

मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय मुंबईत कुठे?
मुद्रांक जिल्हाधिकारी (मुंबई)
मुद्रांक जिल्हाधिकारी (अंधेरी)
मुद्रांक जिल्हाधिकारी (बोरीवली)
मुद्रांक जिल्हाधिकारी (कुर्ला)
मुद्रांक जिल्हाधिकारी (अंमलबजावणी-एक)
मुद्रांक जिल्हाधिकारी (अंमलबजावणी-दोन)

मुद्रांक शुल्क कसे भरावे?

महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरण्यासाठी अनेक सोयी उपलब्ध आहेत, ज्यात ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतींचा समावेश आहे.

रक्कम गणना: मालमत्तेच्या बाजार मूल्यानुसार (Ready Reckoner दरांनुसार) 4% ते 6% (महानगरात 6%). महिलांसाठी 1% सवलत मिळू शकते.

नोंदणी फी: मुद्रांक शुल्कासोबत 1% नोंदणी फी भरावी लागते.

अद्ययावत: 2025 मध्ये कोणतेही मोठे बदल नाहीत, पण igrmaharashtra.gov.in वर तपासा.