पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू ; क्रिकेटच्या इतिहासातील काळा दिवस

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सीमा भागात तणाव आणि लष्करी चकमकी सुरू आहेत. गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (TTP) काबूलमध्ये काही ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर युद्ध अजून पेटले. 8 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या संघर्षानंतर बुधवारी संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा करार झाला. मात्र, शुक्रवारी रात्री पाकिस्तानने पुन्हा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. पाकिस्तानी सैन्याने पक्तिका प्रांतात बॉम्बहल्ले केले, ज्यात नागरी वस्तीवर निशाणा साधण्यात आला. या हल्ल्यात अनेक तरुण क्रिकेटपटूंना जीव गमवावा लागला.

पक्तिका प्रांतातील या हवाई हल्ल्यामुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेट समुदायावर शोककळा पसरली आहे. स्थानिक क्लबचे तीन क्रिकेटपटू कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून यांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना तेव्हा घडली, जेव्हा हे खेळाडू प्रांतीय राजधानी शराना येथे स्थानिक स्पर्धा खेळून अरगुन घरी जात होते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृत खेळाडूंना “अफगाण क्रिकेटचे भूमिगत हिरो” असे संबोधले.

पक्तिका हल्ला आणि आपल्या देशातील खेळाडूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबत होणाऱ्या टी-20 तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही मालिका नोव्हेंबर महिन्यात होणार होती.

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फजलहक फारूकी यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर पोस्ट करत या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्याने लिहिले की, या अत्याचार्‍यांकडून निर्दोष नागरिक आणि आपल्या देशातील क्रिकेटपटूंचा झालेला नरसंहार हा एक भयानक आणि अक्षम्य अपराध आहे. अल्लाह शहीदांना जन्नतमध्ये सर्वोच्च स्थान देवो, आणि गुन्हेगारांना अपमान व आपल्या कोपाचा भागीदार बनवो. खेळाडू आणि निरपराध नागरिकांची हत्या ही शौर्य नाही, ती सर्वात मोठी लाज आहे. अफगाणिस्तान चिरायू राहो…!

दरम्यान, अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खान यानेही आपल्या भावना व्यक्त करत लिहिलं की, “अफगाणिस्तानवरील अलीकडील पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाल्याने मी अत्यंत व्यथित आहे. ही एक अशी शोकांतिका आहे, ज्यात महिलांसह, मुलं आणि जागतिक स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न पाहणारे तरुण क्रिकेटपटू आपले प्राण गमावले. नागरिकांच्या वस्ती आणि संरचनेवर हल्ले करणे ही पूर्णपणे अमानवी आणि बर्बर कृती आहे. मी पाकिस्तानविरुद्धच्या आगामी सामन्यांतून माघार घेण्याच्या ACB च्या निर्णयाचं पूर्ण समर्थन करतो. या कठीण काळात मी माझ्या देशवासीयांसोबत उभा आहे, आपल्या राष्ट्रीय स्वाभिमानापेक्षा मोठं काहीच नाही.”