दिवाळी… हा सणच इतका कमाल आहे, की त्याचं नाव जरी उच्चारलं तरी चेहऱ्यावर आनंद खुलतो. अशा या कमाल सणाची सुरुवात झाली असून, आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत सध्या कलाकारांपासून ते अगदी मंत्रीमहोदयांपर्यंत प्रत्येकजण कुटुंबाला वेळ देताना दिसत आहे. नितीन गडकरीसुद्धा यात अपवाद नाहीत. अशा या केंद्रीय मंत्र्यांचं यंदाचं दिवाळी सेलिब्रेशन नेमकं कसं आहे याची प्रचिती देणारा व्हिडीओ खुद्द गडकरींच्याच सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
नितीन गडकरी यांनी आपल्या व्यग्र बैठका, कामकाज आणि वेळापत्रकातून वेळ काढत खास वेळ नातवंडांना दिला. गंमत म्हणजे यावेळी नातवंडांना चक्क दिवाळीचे फटाके खरेदी करून देण्यासाठी त्यांच्यासमवेत बाजारपेठ गाठली. नागपूरच्या बाजारपेठेत दिवाळीसाठी फटाक्यांची खरेदीसाठी गडकरी पोहोचले आणि तिथं असणाऱ्या दुकानदारांची तारांबळच उडाली, तर काहींनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. गडकरी दरवर्षी आपल्या कामातून वेळ काढत नातवंडांसोबत फटाके खरेदीसाठी जातात, सणावाराला या बच्चेकंपनीसमवेत वेळही घालवतात आणि हे वर्षसुद्धा इथं अपवाद ठरलं नाही.
केंद्रात गडकरी मंत्री म्हणून वावरत असले तरीही नातवंडांच्या बालहट्टापुढं त्यांचं हे ‘आजोबा’ म्हणून दिसणारं रुपही कमाल आहे ज्यामुळं त्यांची ही कौटुंबिक भूमिका नेहमीच चर्चेचा विषय ठरते. यंदाही त्यांनी कुटुंबाची ही परंपरा कायम ठेवत नातवंडांना फटाके खरेदी करत त्यांना आनंद दिला. त्यांचे हे कौटुंबिक क्षण कॅमेऱ्यात कैदही झाले आणि नेटकऱ्यांनी या व्हिडीओला उत्तम प्रतिसाद दिला.
दिवाळी आणि घरातल्या मोठ्यांनी चक्क फटाके खरेदी करून देणं यात एक वेगळीच गंमत असते. आम्ही लहान असताना आमचे बाबा, आजोबा, दादा, अण्णा आम्हाला फटाके आणायचे. फुलबाजीपासून चक्र आणि पाऊस असे एक ना अनेक प्रकारचे फटाके…. आणि दिवाळीच्या असंख्य आठवणी सांगण्यात अनेकजण रममाण होतात. गडकरींनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहतानाही अनेकांनाच त्यांच्या बालपणीचे दिवस आठवले असतील यात शंका नाही…. हो ना ?
