‘ मुंबईत ३४ ह्युमन बॉम्ब घुसलेयत ‘ पोलिसांना धमकीचा फोन

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांना मिळालेल्या धमकीच्या फोनमुळे शहरात खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर फोन करून 34 गाड्यांमध्ये 400 किलो RDX ठेवल्याचा दावा केला आहे. या धमकीमुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

शुक्रवारी वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर आलेल्या फोनमध्ये अज्ञात व्यक्तीने स्वतःला लष्कर-ए-जिहादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगितले. त्याने 34 ह्युमन बॉम्ब आणि 400 किलो RDX चा वापर करून एक कोटी लोकांना मारण्याची धमकी दिली. धमकीला गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी आणि वाहन तपासणी सुरू आहे. विशेष पथके धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला आहे. कॉलचा स्रोत आणि आरोपीची ओळख पटवण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे सांगितले आहे. शहरात गस्त वाढवण्यात आली आहे.यापूर्वी ठाण्यातील कळवा रेल्वे स्टेशन उडवण्याची खोटी धमकी देणाऱ्या 43 वर्षीय रुपेश रणपिसे याला अटक झाली होती. या घटनेमुळे पोलिसांनी धमकीच्या कॉल्सबाबत अधिक सतर्कता बाळगली आहे.मुंबई पोलिसांनी सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आश्वासन दिले असून, नागरिकांना घाबरून न जाता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.