अश्विनच्या बदल्यात येणार ‘हा’ टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू ?

चेन्नई सुपर किंग्ज आगामी आयपीएल सिझनसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाच वेळचे चॅम्पियन रवीचंद्रन अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात घेण्याचा विचार करत आहेत. या संदर्भात गुजरात टायटन्स सोबत प्राथमिक चर्चाही सुरू झाली आहे.

रवीचंद्रन अश्विन, ज्यांनी नऊ वर्षांनंतर सीएसकेमध्ये पुनरागमन केले होते, त्यांनी मागील सिझनमध्ये 9 सामन्यांत 7 बळी घेतले. पण त्यांचा सरासरी आकडा 40.42 इतका होता. काही दिवसांपूर्वी अश्विन आणि संजू सॅमसनच्या ट्रेडबद्दल अफवा पसरल्या होत्या, मात्र अश्विनच्या IPL निवृत्तीमुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अश्विनच्या बाहेर पडल्यानंतर सीएसके व्यवस्थापनाला आता त्यांच्या जागी योग्य पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. तमिळ समयमच्या अहवालानुसार, सीएसकेने गुजरात टायटन्सकडे वॉशिंग्टन सुंदरच्या उपलब्धतेबाबत संपर्क साधला आहे. अहवालात हेही नमूद करण्यात आलं की, गुजरात सुंदरला कोणत्याही अटींशिवाय रिलीज करण्यास तयार आहे.

वॉशिंग्टन सुंदर चांगल्या फॉर्ममध्ये असूनही गुजरात टायटन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपली जागा पक्की करू शकला नाही. त्याने फक्त 6 सामने खेळले, 65 चेंडू टाकून 2 बळी घेतले, तर 133 धावा केल्या, स्ट्राइक रेट 166.25 होता. गुजरातने त्याला3.2 कोटींना खरेदी केले होते, आणि हीच रक्कम सीएसके ट्रेडसाठी देऊ शकते.

चेन्नई सुपर किंग्ज सध्या अनुभवी खेळाडूंपेक्षा तरुण खेळाडूंवर फोकस करण्याचा विचार करत आहे. मागील सिझनमध्ये त्यांनी राहुल त्रिपाठी, विजय शंकर, दीपक हुड्डा आणि अश्विन यांसारख्या अनुभवी नावांवर भर दिला होता, पण अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्यामुळे फॅन्समध्ये नाराजी वाढली आणि टीव्ही व्ह्यूअरशिपही कमी झाली.

सीएसके व्यवस्थापनाने आता कमी कामगिरी करणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. अश्विननेही संघाने अधिकृतरीत्या रिलीज करण्यापूर्वी IPL निवृत्तीची घोषणा केली.

पूर्वी सीएसके नेहमीच अनुभवावर भर देणारा संघ म्हणून ओळखला जायचा. अंबाती रायडू, सुरेश रैना आणि ड्वेन ब्रावो यांसारख्या खेळाडूंनी दशकभर संघाचं बळ वाढवलं. मात्र त्यांच्या निवृत्तीनंतर ही रणनीती फारशी चालली नाही. संघाने रोबिन उथप्पा आणि अजिंक्य रहाणे यांसारख्या अनुभवी नावांवर विश्वास ठेवला, पण त्याचा मोठा फायदा झाला नाही.