शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात सध्या आठ ते दहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. ५) रात्री सातच्या सुमारास उजनी धरणातून भीमा नदीतून सोलापूरसाठी पाणी सोडण्यात आले आहे.
पाच हजार क्युसेक विसर्गाने सोडलेले पाणी १४ जानेवारीपर्यंत औजमध्ये पोचणार आहे.सोलापूर शहराला सध्या सोलापूर ते उजनी या जुन्या पाइपलाइनद्वारे आणि हिप्परगा तलाव व औज बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतोय. हिप्परगा तलावातून गावठाण भागाला तर शहरातील जुळे सोलापूरसह बहुतेक भागाला औज बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. महापालिकेच्या वतीने औज बंधाऱ्याची दुरूस्ती केल्याने गळती थांबली तर काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे औजमध्ये पाणी शिल्लक होते.
२० डिसेंबरला उजनीतून सोडावे लागणारे पाणी आता सोडण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी सुरवातीला सोळाशे क्युसेकने सोडलेल्या पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने पाच हजार क्युसेक केला आहे. दरम्यान, पंढरपूरपर्यंत भीमा नदीत पाणी असल्याने आणि नदी फार कोरडी नसल्याने सोलापूर शहराच्या या आवर्तनासाठी पाच टीएमसीपर्यंत पाणी जाईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले.