नगरपरिषद निवडणुकीची देवेंद्र फडणवीस रणधुमाळी शिगेला पोचली असतानाच, आज ३० नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असून, शहरातील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांगोला येथे झालेली सभा चांगलीच गाजली होती.
सांगोल्यातील शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना या निवडणुकीत निर्माण झाला आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेले हे दोन्ही पक्ष सांगोल्यात मात्र एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती बनकर यांना शेतकरी कामगार पक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील गटाने दिलेला पाठिंबा ही या निवडणुकीतील ‘अनपेक्षित युती’ ठरत असून, या गठबंधनामुळे स्थानिक राजकारणात नवे गणित तयार झाले आहे.
गेल्या रविवारी झालेल्या शिंदे यांच्या सभेत माजी आमदार शहाजी पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका करत राजकीय वातावरण चांगलेच पेटवले होते. यानंतर केवळ आठवडाभरातच मुख्यमंत्री फडणवीस सांगोल्यात येत असल्याने ते त्यांच्या भाषणात शिवसेनेवर काय टोले झोडतात, स्थानिक समीकरणांबाबत कोणती भूमिका मांडतात आणि शहाजीबापूंच्या आरोपांना उत्तरे देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील एकत्र सत्तेतले दोन प्रमुख घटकपक्ष सांगोल्यात मात्र परस्परविरोधी बाजूने मैदानात उतरले असल्याने या सभेमुळे तालुक्यातील निवडणुकीत नवा कलाटणीकारक टप्पा येण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त होत आहे.
युतीचा नवा फंडा, सभांचा धडाका
सांगोला शहरात शेकाप, भाजप व दीपक साळुंखे पाटील गट यांच्यात झालेल्या युतीबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. या युतीवर टीकाटिप्पणीही केली जात आहे. गेल्या रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेने माहोल तापवला. या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असून, उत्सुकता शिगेला पोचली आहे.
दरम्यान, पालकमंत्री गोरे यांनीही तालुक्यात प्रचार बैठकींचा धुरळा उडवत वातावरण आणखी चांगलेच ढवळून काढले आहे. युतीनंतर शहरातील सभांची रेलचेल आणि नेत्यांची धावपळ पाहता, सांगोल्यातील राजकीय तापमान दिवसेंदिवस चढत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
