इस्लामपुर, येथील आगारामध्ये हिंदू हृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत छत्रपती संभाजी नगर व नाशिक प्रदेश प्रादेशिक व्यवस्थापिका अनघा बारटक्के, तसेच प्रादेशिक अभियंता अशोक पन्हाळकर यांच्या समितीमार्फत बसस्थानकावरील स्वच्छतेची पाहणी करण्यात आली.
या अभियानांतर्गत बसस्थानक परिसरातील केलेले सुशोभिकरण, बसस्थानकावरील स्वच्छतागृहातील स्वच्छता, चालक, वाहक यांचे विश्रांतीगृह यांची पाहणी करण्यात आली. महिला चालक वाहकांचे विश्रांतीगृह, एसटी बसची स्वच्छता, बसस्थानकात डिजिटल स्वरुपातील प्रसारित केलेली विविध माहिती पत्रके पथकाने पाहिली. बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळामार्फत पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा योग्य आहेत का ते पाहिले. महामंडळामार्फत प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या सवलती तसेच जिल्ह्यातील पर्यटन स्थळे या बाबतची भित्तीपत्रके आदींचीही पाहणी करण्यात आली. महिलांसाठी तयार करण्यात आलेले हिरकणी कक्ष त्यामध्ये पुरविण्यात आलेल्या सुविधांचीही पाहणी पथकामार्फत करण्यात आली. यावेळी युनुस शेख, प्रवासी मित्र मान्यवर आदींनी पाहणी केली. इस्लामपूर आगारातील स्वच्छतेबाबत समितीने समाधान व्यक्त केले आहे. यावेळी विभाग नियंत्रक प्रतिनिधी, आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे, स्थानक प्रमुख नंदकुमार जाधव, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक धर्मराज सावंत व सहाय्यक वाहतूक अधिकारी, इतर मान्यवर उपस्थित होते.