वर्धा (Wardha) जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (orange farmers ) मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानासाठी सरकारनं विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. आर्वी, कारंजा व आष्टीतील शेतकऱ्यांना फडणवीस सरकारची मदत जाहीर झाली आहे. 12 कोटी 38 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्धा व नागपूर विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे.
315 गावांतील 8 हजार 999 शेतकऱ्यांना मदत मिळणार
वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 315 गावांतील 8 हजार 999 शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. 5 हजार 506 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. डीबीटी द्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे.
निधी खर्च करताना शासन निर्णयांच्या सुचनांचे पालन करावे
कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देतांना द्विरुक्ती होणार नाही याची तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने दक्षता घ्यावी असे सांगण्यात आले आहे. तसेच वरील निधी खर्च करताना शासन निर्णयांच्या सुचनांचे पालन करावे. ज्यासाठी निधी दिला आहे त्याच कारणासाठी निधी वापरावा. लाभार्थ्यांना मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशीला जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा.
अवकाळी पावसाचा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता मोठा फटका
मागील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला होता. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती. विशेषत: फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. त्यांच्या पूर्ण बागाच उद्धवस्थ झाल्या होत्या. त्यामुळं वर्धा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले होते. या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार वर्धा जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानासाठी सरकारनं विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. आर्वी, कारंजा व आष्टीतील शेतकऱ्यांना फडणवीस सरकारची मदत जाहीर झाली आहे. सरकारनं 12 कोटी 38 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
