स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी मोठी बातमी! संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा २०२५च्या पदसंख्येत दुपटीने वाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा २०२५च्या पदसंख्येत वाढ करण्यात आली आहे. आता एकूण ६०५ पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे.

‘एमपीएससी’ने शुद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा २०२५ची जाहिरात १८ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात एकूण ३८५ पदांचा समावेश होता.

‘शासनाकडून सुधारित, अतिरिक्त मागणीपत्र प्राप्त झाल्यास पदसंख्या, आरक्षणामध्ये शासनाच्या संंबंधित विभागाच्या सूचनेनुसार वाढ, बदल होण्याची शक्यता आहे, संबंधित पदे पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करताना विचारात घेतली जातील, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्वपरीक्षेच्या निकालापूर्वी या परीक्षेच्या परीक्षा योजनेतील सेवांपैकी नवीन सेवेसाठी शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झाल्यास संबंधित सेवेचा समावेश करताना देण्यात येणाऱ्या शुद्धीपत्रकानुसार मूळ जाहिरातीस अनुसरून संबंधित सेवेसाठी उमेदवारांकडून विकल्प घेण्यात येईल,’ असे जाहिरातीद्वारे स्पष्ट करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर, शासनाकडून प्राप्त झालेल्या अतिरिक्त, सुधारित मागणीपत्रानुसार आता ६०५ पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार आता राज्यसेवेअंतर्गत पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त संवर्गाची चार पदे, सहायक राज्य कर आयुक्त संवर्गाची ७९ पदे, कामगार आयुक्त एक पद, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता विभाग सहायक आयुक्त संवर्गाची दोन पदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संवर्गाची २१ पदे, राज्य उत्पादक शुल्क अधीक्षक तीन पदे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उपसंचालक, प्रकल्प अधिकारी संवर्गाची ११ पदे, मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी संवर्गातील तीन पदे, सहायक गटविकास अधिकारी संवर्गाची १५ पदे, राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक संवर्गातील एक पद, राज्य उत्पादन शुल्क सहायक आयुक्त संवर्गातील एक पद, सहायक प्रकल्प अधिकारी, संशोधन अधिकारी संवर्गातील चार पदे, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता मार्गदर्शन अधिकारी संवर्गातील पाच पदांचा समावेश आहे. तसेच, वन सेवेतील वनक्षेत्रपालांची १४४ पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सेवेतील सहायक कार्यकारी अभियंता संवर्गाची २८ पदे, सहायक अभियंता श्रेणी १ संवर्गातील ८६ पदे, सहायक अभियंता श्रेणी २ संवर्गातील १८२ पदे, विद्युत अभियांत्रिकी सेवेतील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सहायक अभियंता श्रेणी २ संवर्गातील ११ पदे समाविष्ट असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

जाहिरातीस अनुसरून या पूर्वी राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज सादर केलेले उमेदवार या सेवेतील वाढीव, अतिरिक्त संवर्गासाठी अर्हताप्राप्त ठरत असल्यास संबंधित सेवेतील संवर्गासाठी त्यांचा विकल्प ग्राह्य धरण्यात येईल. पदसंख्या, आरक्षणात कोणताही बदल झाल्यास त्याबाबतचा तपशील वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.