एखतपूर पंचायत समिती गणात निवडणुकीची रणधुमाळी वाढली असून सांगोला तालुका विकास आघाडीच्या उमेदवार सौ. सुवर्णा संजय नवले यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे. गावागावात प्रत्यक्ष भेटी, संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांचा प्रचार अधिक प्रभावी ठरत आहे.
निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासूनच सौ. सुवर्णा नवले यांनी सभा-केंद्रित प्रचारापेक्षा गावभेटी, चौकसभा व थेट जनसंवाद यावर भर दिला आहे. एरवपूर गणातील सोनलवाडी, बागलवाडी, अक्कलाणी-ठोंबेवाडी, लक्ष्मीनगर, नरळेवाडी, वाकी शिवणे, गायगव्हाण, हलदविंडी, शिवभावी मेटकरवाडी, धायटी, शिवणे, चिंचोली आदी गावांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार भेटी देत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.
पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण तसेच युवकांच्या रोजगाराच्या संधी हे मुद्दे गावभेटीदरम्यान प्राधान्याने मांडण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यावर ठोस उपाययोजनांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शिक्षण क्षेत्रातील अनुभव, सामाजिक कार्याची पार्श्वभूमी आणि पारदर्शक कार्यपद्धती यामुळे सौ. सुवर्णा नवले यांना सर्वसामान्य नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
विशेषतः महिला व तरुण वर्गामध्ये त्यांच्या प्रचाराला मोठा उत्साह दिसून येत आहे. गावागावात थेट पोहोचून मतदारांशी संवाद साधण्याची ही पद्धत प्रभावी ठरत असून, प्रचाराच्या या टप्प्यावर सौ. सुवर्णा नवले या आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
