पुनर्जीवनामुळे सांगोला, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील 23 गावे हिरवीगार

दुष्काळाने जर्जर असलेल्या सांगोला, पंढरपूर, माळशिरस (जि. सोलापूर) तालुक्यातील २३ गावे- वाड्यावासियांनी कासाळगंगा ओढ्याचे ४२ किलोमीटर पुनर्जीवन करत नदी साकारली.

त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेकडून ४ कोटी ५७ लाखाचा सीएसआरचा निधी या कामासाठी मिळाला. कासाळगंगा नदी पूर आणि दुष्काळ मुक्तीचे मॉडेल बनले असून गाळाने पडीक जमीन लागवडीखाली येत माळरानावर फळबागा फुलल्या आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांचे स्थलांतर थांबण्यास मदत झाली आहे.

कासाळगंगा ओढ्याचे पहिल्या टप्प्यात ५ किलोमीटर लांबीचे पुनर्जीवन महूद (ता. सांगोला) ग्रामस्थांनी लोकसहभागातून केले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याला उपलब्ध करून दिलेल्या निधीतून डिझेल खर्चाचे सहाय्य झाले. पाणी उपलब्ध होत असतानाच पुनर्जीवन कामातून उपलब्ध झालेल्या गाळातून पडीक क्षेत्र लागवडीखाली आले. अतिक्रमण काढताना जमिनीच्या तुकड्यापेक्षा पाणी महत्वाचे मानले गेल्याने प्रशासकीय मदतीची आवश्यकता भासली नाही.

टाटा समूहाच्या वारशातून प्रेरित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) व त्यांच्या CSR शाखा TCS फाउंडेशन यांनी महाराष्ट्रातील सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा जपण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील ४२ किमी लांबीच्या कासाळगंगा नदीचे पुनरुज्जीवन TCS ने केले. ४ कोटी ५७ लाख खर्चून नदीपात्रातील गाळ काढणे, बंधाऱ्याची स्थिरता व वृक्षारोपण करण्यात आले. यामुळे २४ गावे व ३ तालुक्यांना लाभ झाला. भूजलपातळी वाढली, पिकांच्या पद्धतीत बदल झाला व स्थलांतर थांबले व उलट स्थलांतरित नागरिक वापस येण्याची प्रक्रिया सुरू झाली. TCS च्या या उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील नैसर्गिक संसाधनांचे पुनरुज्जीवन होऊन सामाजिक-आर्थिक बदल घडत आहेत.