सोलापूरकरांची चिंता वाढणार. …

सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. पावसाचा अभाव यामुळे तेथील शेतकरी हा पावसाअभावी कर्जबाजारी होत चालला आहे. शेतामध्ये पिकांचे न येणारे उत्पादन जर उत्पादन आले तर अवकाळी पाऊस यामुळे होणारे नुकसान यामुळे खूपच हतबल शेतकरी झालेला आहे.

यंदा उजनी धरणाची अवस्था अतिशय बिकट बनली असून, पावसाने फिरवलेली पाठ आणि ढिसाळ नियोजन यामुळे आत्ताच उजनी धरणाची पाणीपातळी अवघ्या 9 टक्क्यांवर पोहचली आहे. अशात आज घडीला कालव्यातून दुसरी पाळी देण्याचे ठरल्यास 22 जानेवारीपर्यंत उजनीची पाणीपातळी वजा होईल.

सध्या उजनी धरणातून सोलापूर , पंढरपूर , सांगोला आणि मंगळवेढा नगरपालिकेला पिण्यासाठी 5 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात सोलापूर शहरातील नागरिकांना पाण्याची बचत करण्याची वेळ येणार आहे. 

आज उजनी धरणात केवळ 9 टक्के पाणीसाठी शिल्लक असून, गेल्यावर्षी याच दिवशी तब्बल 101 टक्के एवढा जिवंत पाणीसाठा होता. सोलापूरची तहान भागवण्यासाठी धरणातून 5 टीएमसी पाणी सोडावे लागते. हे पाणी सोलापूरकरांना केवळ 50 दिवस पुरणार असल्याने अजून, मार्च आणि मे महिन्यात दोन रोटेशनमधून 10 ते 12 टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.

यातच हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा अलनिनो किंवा सुपर अलनिनोचा फटका बसल्यास जुलै मध्येही पाण्याचे रोटेशन सोडावे लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात मृत साठ्यातून पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. 

सोलापूरची वरददायीनी म्हणून ओळख असलेल्या उजनीच्या पाण्याची पातळी खालवल्यानंतर सोलापूर महापालिका प्रशासन ऍकशन मोडमध्ये आले आहे. पाण्याची नासाडी करणाऱ्या लोकांवर थेट कारवाईचा बडगा उचलण्याचा इशारा सोलापूर महानगरपालिकेने दिलाय.

पाण्याची नासाडी झाल्याचे दिसल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सोलापूर महानगरपालिकेने या संदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे. नळाला पाणी आले की नळ सुरू ठेवून भांडी धुणे, कपडे धुणे, चारचाकी आणि दुचाकी धुणे, रस्त्यावर अनावश्यक पाणी मारणे असे प्रकार सोलापुरात सातत्याने दिसून येतात.

यामुळे पाण्याची नासाडी तर होतेच शिवाय रस्त्यावर पाणी साचून रस्त्यांचे आयुष्यही घटते. साचलेल्या पाण्यामुळे आरोग्यास धोकाही उद्भवतो.त्यामुळे पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सोलापूर महापालिकेने परिपत्रकात म्हटले आहे.