यांना सांगलीच्या तीन तालुक्यात प्रवेशबंदी ….

कऱ्हाड शहरासह तालुका परिसरात सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या दोघांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच त्या दोघांना सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्यातही प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.आबीद आलम मुजावर (वय २६) व साहील आलम मुजावर (२१, दोघे रा. पालकरवाडा, मंगळवार पेठ, कऱ्हाड) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यात टोळीने जमाव जमवुन दुखापत करणे, शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करणाऱ्यांसह अनेकांना लक्ष्य केले आहे. त्याचदृष्टीने शहरातील दोघांना हद्दपार केले आहे.

पोलिस निरिक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी दोघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनाही मान्यता दिली होती. त्यानुसार त्या दोघांना सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगांव तालुक्यातुन दोन वर्षे हद्दपार करण्याचा प्रस्तावात उल्लेख केला होता.

संबंधित दोघेही जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली गेली. तरीही त्यांच्यावर परिणाम होत नव्हता. तसेच त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यामुळे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी हद्दपार प्राधिकरणासमोर सुनावणी घेतली.

त्यानुसार त्या दोघांना पोलिस उपाधीक्षक शेख यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सातारा जिल्हा व सांगली जिल्हयातील शिराळा, वाळवा, कडेगांव तालुका हद्दीतुन दोन वर्षासाठी हद्दपारीचा आदेश केला आहे.