आर्थिक वादातून हॉटेल चालकाची गोळ्या झाडून हत्या

जमीन खरेदी व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाणीतून दोनवडे (ता. करवीर) येथे एका हॉटेल मालकाचा दोघांनी पिस्तूलमधून गोळी झाडून काल रात्री खून केला. चंद्रकांत आबाजी पाटील (वय ५५, रा दोनवडे) असे खून झालेल्या मयत व्यक्तीचे नाव आहे

संशयित आरोपी सचिन गजानन जाधव, दत्तात्रय कृष्णात पाटील (दोघे रा. खुपिरे, ता. करवीर) अशी त्यांची नावे असून ते पोलिसांसमोर दाखल झाले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत आबाजी पाटील यांचे कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दोनवडे फाटा येथे लॉजिंग हॉटेल आहे. तसेच ते प्लॉट, बांधकाम देवाणघेवाण व्यवसाय करत होते. दोनवडे व खुपिरे ही वेशिवरची गावे आहेत. मयत चंद्रकांत पाटील, संशयित सचिन जाधव, दत्तात्रय पाटील यांच्यात आर्थिक देवाण-घेवाण व्यवहार होता. चंद्रकांत पाटील हे जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करण्यात माहितगार होते. त्यांच्याकडे या दोघांनी जमीन खरेदीसाठी काही रक्कम दिली होती. ती परत न मिळाल्याने वाद होता. तर पाटील यांनी या दोघांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम दिली होती. पण शेअर बाजाराने साथ न दिल्याने ही रक्कम परत करता आली नव्हती. याही कारणातून वाद होता. त्यातून नेहमी भांडणे होत असत. त्यातून त्यांच्यात बैठकही झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.