हातकणंगलेतील पेठवडगावच्या उपनिबंधक कार्यालयाला मंजुरी

सरकारी कामासाठी सामान्य जनतेला खूपच हेलपाटे मारावे लागतात. कारण एका फेरीत कधीच काम पूर्ण होत नाही. तसेच सरकारी कार्यालय जर गावापासून दूर असेल तर मात्र सर्व सामान्य जनतेतून नाराजीचा सूर येतो. हातकणंगले तालुक्यातील लोकांना छोट्या-छोट्या कामांसाठी निलेवाडी, मनपाडळे, घुणकीपासून ३० ते ३५ किलोमीटर हातकणंगले येथे यावे लागते. तेथील गर्दी आणि कामकाज पाहता एका फेरीत काम होत नाही. त्यामुळे नागरिकांचा पैसा आणि कामाचे दिव वाया जात आहेत. याबरोबरच हातकणंगले येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी व तत्सम कामाकरिता प्रचंड गर्दी होत असते.

कोणत्याही कामासाठी आधी दोन-चार दिवस नंबर लावावा लागतो. दररोज ३५ ते ४० दस्त नोंदणीची क्षमता असणाऱ्या या कार्यालयात जवळपास ९० ते १०० दस्त येतात, तरीही ६० ते ६५ दस्तांची नोंदणी होते. उर्वरित दस्तांची दुसऱ्या दिवशी नोंदणी करावी लागते. त्यातच सर्व्हर डाऊनचा व्यत्यय येत असल्याने पुन्हा दस्तांची संख्या वाढत जाते. या पार्श्वभूमीवर तालुक्यात पेठवडगाव येथे आणखी एक कार्यालय करावे, अशी मागणी नागरिकांतून होत होती.

या कार्यालयाचा प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित असल्याबाबत व हालचाली ठप्प असल्याबाबत यात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर काहीच दिवसांत हा प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्षात कामकाज सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यासाठी नगरपालिका तसेच अन्य दोन ठिकाणी जागेची पाहणी करण्यात येणार आहे.महिन्याच्या आतच नवीन कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे.