गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या शेअर्सची मोठी चर्चा होत आहे. या शेअर्समध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअरचाही समावेश आहे. शुक्रवारचा दिवस कंपनीसाठी खूप खास ह ठरला. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे मार्केट कॅप २ लाख कोटींच्या पुढे गेलं आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. तर शनिवारीही कामकाजादरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची तेजी दिसून आली.
तर शुक्रवारी कामकाजाच्या सुरूवातीला कंपनीचे शेअर्स बीएसईवर १४९.४० रुपयांच्या पातळीवर उघडले. मात्र काही वेळाने तो १६०.८० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. दरम्यान, शुक्रवारी कंपनीचं मार्केट कॅप २ लाख कोटींच्या वर गेलं.
आज शनिवारीही या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली आणि शेअर २०.५१ टक्क्यांच्या उसळीसह १७६.२५ रुपयांवर पोहोचला. हा या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे.
महिन्याभरात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये तब्बल ९० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसू आली आहे. २० डिसेंबर २०२३ रोजी कंपनीचे शेअर्स ९४.४५ रुपयांच्या पातळीवर होते. परंतु २० जानेवारी २०२४ रोजी कंपनीच्या शेअर्सनं १७६.२५ रुपयांची पातळी गाठली.