पुढच्या २८ तारखेपर्यंत राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय रजा वगळता कुठल्याही सुट्या मिळणार नाहीत. गृह खात्याचा हवाला देत तशा प्रकारचे आदेश पोलीस महासंचालनालयाने शुक्रवारी जारी केले आहे.
सोमवारी २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. त्यामुळे रामभक्तांकडून राज्यभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढच्या काही तासांत ठिकठिकाणच्या धार्मिक स्थळांवरची गर्दी वाढणार आहे.
प्रजासत्ताक दिनाचा सोहळाही चार दिवसांवर आला आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई पदयात्रा सुरू केली आहे. या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळणार, अशी माहिती राज्य पोलिस दलाला आधीच गुप्तचर खात्याकडून मिळालेली होती.जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे ठाकले आहे.
कुठल्याच ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. त्यासाठी जागोजागच्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांचे मोठे मणूष्यबळ हाताशी ठेवावे लागणार आहे. ते लक्षात घेता पोलीस महासंचालनालयाने गृह खात्याच्या निर्णयाचा हवाला देत शुक्रवारी एक आदेश जारी केला.
विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या आदेशपत्रात राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्यांसह सर्व प्रकारच्या (वैद्यकीय वगळता) सुट्या बंद करण्याचे आदेश दिले आहे.