राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? याचा तिढा सोडवण्यासाठी उद्या (शुक्रवारी) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी संपन्न होणार आहे. त्यादृष्टीने आज (गुरुवारी) दिल्लीत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या विस्तारित कार्यसमितीची बैठक संपन्न होतेय.
राष्ट्रवादी काँग्रेसममध्ये उभी फूट पडल्यानंतर शुक्रवारी निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. उद्या पहिली तारीख असल्याने गुरुवारी दिल्लीमध्ये विस्तारित कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीसाठी २४ राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती आहे. आयोगाकडील सुनावणीमध्ये काही विपरित निर्णय झालाच तर पुढची रणनीती काय असेल? यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.
निवडणूक आयोगामध्ये शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी हे बाजू मांडणार आहेत. बैठकीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारा प्रस्ताव पीसी चाको यांनी मांडला. त्याला खासदार वंदना चव्हाण यांनी अनुमोदन दिले. हा प्रस्ताव मान्य आहे का, असे पवारांनी विचारल्यानंतर सर्वांनी हात उंचावून पाठिंबा दिला आणि प्रस्ताव मंजूर केला.
दरम्यान, यावेळी प्रफुल्ल पटेल मुर्दाबाद, अशा घोषणा अंदमानच्या प्रवक्त्या उमा भारती यांनी दिल्या. बैठकीमध्ये सर्व प्रदेशाध्यक्षांकडून प्रतिज्ञापत्र भरुन घेण्यात येत आहेत. सर्व प्रतिज्ञापत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्याची शक्यता आहे. पक्षाचं संघटन शरद पवार गटाच्या बाजूने आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.