विटा येथील चोरीस गेलेली सोनसाखळी पोलिसांनी दिली परत 

विटा येथील साखळी चोरी प्रकारणातील साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने न्यायाधीशांच्या आदेशानुसार फिर्यादी विमल बाळू कदम (वय ६०, भूड, ता. खानापूर) यांना पोलिसांनी परत मिळवून दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली. फडतरे म्हणाले, भूड येथील विमल कदम यांचे भूड येथे किराणा मालाचे दुकान आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी ६ जून २०२४ रोजी रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसडा मारून नेली होती. तशी फिर्याद वृध्देने विटा पोलिसांत दिली होती.

साखळी चोरी करणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना तासगाव पोलिसांनी पकडले. पकडलेले चोरटे व दागिने तासगाव पोलिसांनी विटा पोलिसांच्या ताब्यात दिले. विटा न्यायालयाच्या आदेशानुसार साठ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि लॉकेट संबंधित महिलेला परत केल्याचे फडतरे यांनी सांगितले.