राज्यात अजून थंडीचा राहणार मुक्काम…..

राज्यात यंदा थंडीचा कडका डिसेंबर महिन्यात जाणवला नाही. संक्रांतीनंतर थंडीची तीव्रता कमी होत असते. परंतु जानेवारी महिन्यात थंडी पडली नाही. आता जानेवारी संपत असताना थंडीची हुडहुडी वाढली आहे. संपूर्ण राज्य गारठले आहे. अनेक शहरांचे तापमान दहा अंशाच्या खाली आले आहे.

अजून दोन दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे आणि मुंबईमध्ये गारठा कायम आहे. पुण्याचे तापमान 8.6 तर मुंबईचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअसवर आले आहे.राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये गार वारे वाहत आहे. पुणे आणि नाशिकचे तापमान 8.6 अंश सेल्सिअसवर खाली आले आहे. यामुळे सकाळीही स्वेटर घालावे लागत आहे. नाशिकपेक्षा थंड नाशिकमधील निफाड झाले आहे. सलग चौथ्या दिवशी देखील निफाडच्या तापमानात घसरण झाली आहे. निफाडचा पारा 4.5 अंश सेल्सिअसवर आला आहे. निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रामध्ये ही नोंद करण्यात आली.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, शुक्रवारपासून पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहील आणि कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवस थंडी कायम राहील. पुणे, जळगाव, मालेगाव, नाशिक, अकोला, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या शहराचे तापमान दहा अंशाच्या खाली होते.