दिवसेंदिवस अनेक अपघाताच्या घटना आपल्या कानी पडतच असतात. हुपरी शिवप्रतिष्ठानच्या रोहिडेश्वर ते प्रतापगड गडकोट मोहिमेला गेलेल्या (हुपरी ता.हातकणंगले) येथील सागर पांडुरंग वाईंगडे (वय २२, रा. नेहरू चौक) या तरुणाचा रायरेश्वर किल्ल्यावरून घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेची नोंद भोर पोलिस ठाण्यात झाली आहे. रोहिडेश्वर ते प्रतापगड, अशा तीन दिवसांच्या गडकोट मोहीमेत सागर हा मित्रांसह सहभागी झाला होता. मोहिमेत सहभागी सर्वजण पुढे निघून गेले होते.
मात्र, सागर वाईंगडे, रोहन गोंधळी व ऋषिकेश व्हटकर काही कामांमुळे मागे राहिले होते. मोहिमेला गाठण्यासाठी हे तिघे जण मिळेल त्या रस्त्याने निघाले होते. तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावरून भोरा जात असता सागरचा पाय घसरला व कोर्ले (ता. भोर) गावच्या बाजूला असणाऱ्या दरीत तो पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. भोरच्या सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू टीमच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन चार ते पाच 7 तासांच्या अथक परिश्रमानंतर सागरचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.