एकदा गुंतवणूक, दरमहा कमाई करण्याची संधी!

प्रत्येक व्यक्तीला गुंतवणूक ही करायची असतेच. आपल्या भविष्यासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी बचत ही करणे खूपच गरजेचे आहे. पोस्ट ऑफिस अनेक गुंतवणूक योजना  चालवते. पोस्ट ऑफिस सरकारी योजना असल्यामुळे यामध्ये सुरक्षित गुंतवणूक आणि परताव्याची हमी मिळते. पोस्ट ऑफिस योजनांमध्ये मिळणारी सुरक्षितता आणि हमीमुळे नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळतो. पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक बचत योजना आहेत, यामधील एका योजनेबाबत आम्ही सांगणार आहोत. या योजनेमध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दरमहा कमाई करण्याची संधी मिळते. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना याबाबत अधिक सविस्तर माहिती वाचा.

दर महिन्याला गुंतवणूक करण्याचा त्रास नको असणाऱ्यांसाठी ही योजना खास आहे, यामध्ये एकदा गुंतवणूक करुन तुम्हाला दर महिन्याला परतावा मिळतो, त्यामुळे ही योजना अनेकांसाठी गुंतवणुकीचा पहिला पर्याय ठरतो. या योजनेमध्ये तुम्हाला फक्त एकदा पैसे भरावे लागतात, त्यानंतर प्रत्येक महिन्याला तुम्ही यातून कमाई करू शकता. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिस खात्यात 9 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकता. या योजनेत तुम्ही वैयक्तिक किंवा जॉईंट अकाऊंटही सुरु करु शकता. या योजनेअंतर्गत 10 वर्षांवरील अल्पवयीन व्यक्तीही स्वतःच्या नावावर खातं उघडू शकतो. या गुंतवणूक योजनेत भरघोस परताव्याची हमी मिळते.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाल दरमहा व्याज मिळते. ही व्याजाची रक्कम म्हणजे तुमची दर महिन्याला होणारी अतिरिक्त कमाई असेल. महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये दर महिन्याला 7.4 टक्के व्याज मिळते.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा कालावधी 5 वर्षे आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये एकाच वेळी पाच वर्षांसाठी पैसे जमा करू शकता. अशाप्रकारे, तुमच्या खात्यात 5 वर्षे सतत दर महिन्याला व्याज जमा होत राहील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यावरील व्याज काढून घेऊ शकता. मॅच्युरिटीवर म्हणजेच पाच वर्षांच्या कालावधीनंतर, तुमचे जमा केलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, यादरम्यान तुम्हाला व्याज मिळत राहील.

योजनेची खास वैशिष्ट्ये

  • पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न ही सरकारी योजना आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात.
  • या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे, पण आपात्कालीन परिस्थितीत तुम्ही मुदतपूर्तीपूर्वीही पैसे काढू शकता.
  • पाच वर्षानंतर, तुम्ही हे पैसे पुन्हा पाच वर्षांसाठी गुंतवू शकता.
  • तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेत 1000 च्या पटीत गुंतवणूक करू शकता.
  • एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करू शकते.
  • जॉइंट अकाउंटमध्ये 15 लाखांपर्यंतची रक्कम जमा करता येते.
  • पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये, 7.4 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये पैसे 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली असले तरी आपात्कालीन परिस्थितीत गरज भासल्यास तुम्ही 5 वर्षापूर्वीही पैसे काढू शकता. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर तुम्ही या योजनेतून पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला काही रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागेल.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडू शकता. खाते उघडण्यासाठी ओळखपत्र, घराच्या पत्त्याचा पुरावा आणि दोन फोटो आवश्यक आहेत. पोस्ट ऑफिस खात्यात तुम्ही पैसे रोख स्वरूपात किंवा चेकद्वारे जमा करु शकता.