सांगोल्यात आठवडी बाजारात चोऱ्यांचे सत्र सुरूच…..

अलीकडच्या या काळामध्ये चोऱ्यांच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली पाहायला मिळते. अनेक मंदिर परिसरामध्ये, बाजारांमध्ये, यात्रा तसेच गर्दीच्या ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाण खूपच वाढलेले आपल्याला दिसून येत आहे. असाच प्रकार सांगोला तालुक्यात काही दिवसांपासून होत आहे. म्हणजेच सांगोल्याच्या आठवडी बाजारांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. सांगोला येथील आठवडी बाजार हा रविवारी असतो आणि या आठवडी बाजारांमध्ये मोबाईल, पर्स, चोरी होण्याचे सत्र हे सुरूच आहे. आठवडी बाजार हा चोरी करणाऱ्या चोरट्यांसाठी पर्वणीच ठरलेला आहे. त्यामुळे सांगोला शहरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत.

त्यामुळे सांगोला तालुक्यातील पोलिसांच्या बिटने याकडे लक्ष घालावे अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सांगोल्याच्या आठवडी बाजारांमध्ये मोबाईल, पर्स तसेच दागिने चोरी होण्याच्या घटना घडत आहेत. मोबाईल चोरीस गेलेल्या नागरिकांना पोलिसांकडून प्रश्नाचा भडीमार पडत आहे. गुन्हेगाराला पकडण्यासाठी फिर्यादीची उलट तपासणी चौकशी केली जाते.

ते उलट चौकशी करण्याचे प्रकार होत असल्यामुळे अनेक जण तक्रार देखील करण्यास जात नाहीत. बाजारांमध्ये भरपूर मोबाईल चोरीस गेले आहेत आणि एखादा अपवाद वगळता पोलिसांना सपसेल अपयश आलेले दिसून येत आहे. पोलिसांनी आठवडा बाजारामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालावे आणि आपली गस्त घालावी अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.