मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरेबाबतची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे मराठ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण सरकारच्या या निर्णयावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी हा कायदा कोर्टात टिकणार नाही यासाठी कायदेशीर बाजूंचा अभ्यास करायलाही सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना सगेसोयरेबाबतचा अध्यादेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली. छगन भुजबळ यांच्या या भूमिकेमुळे सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे सरकार मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करताना दिसत आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका करत आहेत. छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे आता सरकारमध्ये सारं काही आलबेल नाही, असंच चित्र दिसत आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या जोन आमदारांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून थेट हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मागणीवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना त्यांनीदेखील भुजबळांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भूजबळ यांची हकालपट्टी करा. कशाला लाड करता? याला आधी बाहेर काढा, असं आवाहन संजय गायकवाड यांनी केलं आहे. तर संजय शिरसाट यांनीदेखील भुजबळांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे.
“मंत्री छगन भूजबळ जो तिरस्कार करतात ते योग्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भूजबळ यांची हकालपट्टी करा. कशाला लाड करता? याला आधी बाहेर काढा. मंत्रीपदाची शपथ घेताना सरकारच्या विरोधात काम करणार नाही याची शपथ भूजबळ यांनी घेतली आहे. भूजबळ यांच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही सहमत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतलीय. ज्या मराठ्यांनी हा देश वाचवला त्यांच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नाही. एका मंत्र्याच्या विरोधाने सरकारला फरक पडत नाही, मी खुलेआम सांगतोय. त्यांच्या राजीनाम्याने ना सरकारला फरक पडणार आणि ना एनसीपीला”, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली आहे.