भांड्याची पावडर विकायला आले अन्…..

अलिकडच्या काळात अनेक चोरीच्या घटना घडत आहेत. वेगवेगळया माध्यमातून चोर हात साफ करताना पहायला मिळत आहे. गोटखिंडी (ता. वाळवा) येथील भेंदवाड परिसरातील वस्तीवर राहणाऱ्या महिलेस आम्ही भांड्याची पावडर विकणाऱ्या नवीन कंपनीच्या प्रसिद्धीसाठी आलो आहाेत. आपल्याकडील तांब्याची भांडी तसेच सोने-चांदीचे दागिने पॉलिश करून देतो, असा बहाणा करत महिलेचे दाेन ताेळे साेने लंपास करण्यात आले.या प्रकारानंतर तरुणांनी या भामट्यांची परिसरात शोधाशोध केली; मात्र ते सापडले नाहीत.

भेंदवाड परिसरात संपतराव पाटील यांच्यासह तीन ते चार कुटुंबे वस्तीवर राहतात. मंगळवारी सकाळी दोघे अज्ञात तरुण भांडी घासण्याच्या नवीन कंपनीच्या पावडरच्या प्रसिद्धीसाठी आल्याचे सांगत सिंधुताई पाटील यांच्याकडे आले. आम्ही तांब्याची भांडी पॉलिश करून देतो सांगत त्यांनी पाटील यांच्याकडील तांब्याची भांडी पॉलिश करून दिली.

नंतर चांदीही पॉलिश करून देतो म्हणत त्यांचे चांदीचे काही दागिनेही चमकवून दिले. त्याचदरम्यान हातातील साेन्याच्या बांगड्याही पॉलिश करण्यासाठी त्यांनी सिंधुताईंना गळ घातली. त्यांच्यावर विश्वास ठेवत सिंधुताई यांनी आपल्या चार तोळ्यांच्या बांगड्या काढून त्यांच्याकडे दिल्या.

पाॅलिशच्या बहाण्याने भामट्यांनी या बांगड्या पावडर व केमिकलमध्ये टाकून घासून काढल्या. नंतर दुसऱ्या एका भांड्यात केमिकलमध्ये हळद मिसळून त्यामध्ये बांगड्या टाकून दिल्या. पंधरा मिनिटांनंतर त्या बाहेर काढण्यास सांगून भामटे पसार झाले.ही बाब संशयास्पद वाटल्यावर सिंधुताई यांनी पती संपतराव पाटील यांना माहिती दिली.

त्यांनी बांगड्या घेऊन गावातील सराफाकडे वजन केले असता चाळीस ग्रॅमच्या पाटल्या केवळ वीस ग्रॅम भरल्या. दोन तोळे सोने भामट्यांनी लंपास केले. या घटनेनंतर तरुणांनी परिसरात शोधाशोध केली; मात्र भामटे मिळाले नाहीत. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसांत नोंद नव्हती.