अंतरिम अर्थसंकल्प आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशातील चार महानगरासह इतर ठिकाणी तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या भावात बदल केला आहे. देशातील व्यावसायिक गॅसच्या किंमतीत बदल झाला आहे. तर घरगुती गॅसच्या आघाडीवर केंद्र सरकारने ग्राहकांचा रोष काही ओढावून घेतला नाही. सलग सहाव्यांदा घरगुती गॅसच्या किंमती स्थिर आहेत. त्यात काहीच बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलेंडरचा भाव 30 ऑगस्ट रोजी वाढला होता. त्यानंतर त्यात बदल झालेला नाही. आता देशातील चार महानगरांमध्ये काय आहेत गॅस सिलेंडरचा भाव जाणून घ्या…
कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत मामूली वाढ दिसून आली. देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅसच्या किंमतीत 14 रुपये तर कोलकत्तामध्ये भाव 18 रुपयांनी वाढले. तर मुंबईतही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. 15 रुपयांनी किंमतीत वाढ झाली. चेन्नईत 12.50 रुपयांनी किंमती वाढल्या. या चार महानगरात क्रमशः 1769.50 रुपये, 1887 रुपये, 1723.50 रुपये आणि 1937 रुपये असे भाव झाले आहेत.
घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात कोणताही बदल दिसला नाही. सलग सहाव्यांदा घरगुती सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल दिसून आला नाही. आकड्यांनुसार, देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 903 रुपये, कोलकत्तामध्ये 929 रुपये भाव आहे. तर मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 918.50 रुपये आहे. चेन्नईत हा भाव 918.50 रुपये आहे. 30 ऑगस्ट 2023 रोजीनंतर किंमतीत वाढ झालेला नाही. तर 29 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपये कपात केली होती.गेल्या 1 जानेवारी 2024 रोजी 19 किलोग्रॅम सिलेंडरच्या किंमतीत मामूली दिलासा मिळाला होता.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात केली होती. ही अगदी किरकोळ कपात ठरली होती. दिल्ली पासून ते चेन्नईपर्यंत कर्मशियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 1.50 ते 4.50 रुपयांची स्वस्ताई आली होती. या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत 1755.50 रुपये तर मुंबईत सिलेंडरची किंमत 1708 रुपये झाली होती.