आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) राज्यव्यापी संपाची (Strike) हाक देण्यात आली आहे.अनेकदा पाठपुरवठा करून देखील सरकार आश्वासनांच्या पलीकडे कोणतेही कार्यवाही करत नसल्याने राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरजिल्ह्यातील निवासी डॉक्टर देखील या संपात सहभागी होणार असून, याबाबत त्यांच्याकडून अधिकृत पत्रक देखील काढण्यात आले आहे.
निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “ गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टरांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. गेल्या एक वर्षभरात मध्यवर्ती मार्ड संघटनेने अनेकवेळा यासाठी सरकारकडे पाठपुरवठा केला. पण प्रत्येकवेळी आश्वासनांचे गाजर हे प्रशासनाकडून दाखवण्यात आले.
प्रत्यक्षात कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. विविध प्रलंबित मागण्यासाठी मध्यवर्ती मार्ड संघटनेने 7 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून संपावर जाण्याचा इशारा दिलेला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथील सर्व निवासी डॉक्टर हे संपाची भूमिका घेतील. संपामुळे होणाऱ्या रुग्णसेवेवरील परिणामासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, आणि संपाच्या काळात सर्व अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात येतील,” असे निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.