केंद्र सरकारच्या पीएम किसान पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांना ई केवायसी, आधार प्रमाणीकरण, आधार लिंक या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शासनाने दीड वर्षाचा कालावधी दिला होता.
जिल्ह्यातील ४ लाख ६२ हजार ४११ शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्तता केली आहे. उर्वरित ३० हजार शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसानसह राज्य सरकारच्या नमो पेन्शन योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे.देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी पी. एम. किसान सन्मान योजना सुरू केली. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला पाचशे रुपये असे चार महिन्यांचे दोन हजार रुपये वर्षाला तीन टप्यांत दिले जाते.
जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना सुरुवातीच्या टप्यात पेन्शन मिळत होती. पण, यामध्ये निकषाला फाटा देऊन अनेकजण लाभ घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची लाभार्थ्यांची तपासणी झाली, यामध्ये हजारो लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले. यामध्ये लाख ९२ हजार ७१० शेतकरी पात्र ठरले.
त्यानंतर, सबंधितांची केवायसी पूर्तता करण्याची मोहीम केंद्र सरकारने हातात घेतली. गेली दीड वर्ष शासनाने या मोहिमेला मुदतवाढ दिली होती. आतापर्यंत ४ लाख ६२ हजार ४११ जणांनी केवायसी पूर्तता केली आहे. अद्याप ३० हजार २९९ शेतकऱ्यांनी ई केवायसीची पूर्तता केलेली नाही.या शेतकऱ्यांना केंद्राच्या पेन्शनबरोबरच राज्य सरकारच्या ‘नमो’ पेन्शनपासून वंचित रहावे लागणार आहे.