सांगली जिल्हा नियोजन समितीवरील नियुक्तीवरून महायुतीमध्ये वाद रंगला होता. मात्र, त्यावर पडदा टाकत राज्य सरकारकडून समितीच्या सदस्यांची यादी जाहीर केली आहे. निमंत्रित २० सदस्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने बाजी मारली.
अजितदादा गटाला सर्वाधिक सहा, भाजपला पाच, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. आठवले गट, रयत क्रांती आणि राष्ट्रीय समाज पक्षाला प्रत्येकी एका जागेवर संधी देण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीमधील निमंत्रित सदस्यांच्या निवडीवरून गोंधळ सुरू होता.
पालकमंत्री सुरेश खाडे यांनी वेळोवेळी डीपीसीच्या बैठकीआधी निवडी होतील, असे स्पष्ट केले होते. महायुतीमध्ये भाजपसह एकनाथ शिंदे गट, जनसुराज्य शक्ती, आठवले गट आणि रयत क्रांती संघटना यांचा समावेश आहे. त्यामुळे कुणाला संधी द्यायची यावरून एकमत होत नव्हते. निमंत्रित सदस्यांच्या निवडीवरून अनेक वेळा मतभेद उफाळून आले होते
महायुतीमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या निवडी झाल्या होत्या. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये नाराजी होती. याबाबत घटक पक्षातील नेते सदाभाऊ खोत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वीस जणांच्या निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली.