सर्वांच्या मनात घर केलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज दुसरा स्मृतीदिन आहे. लतादीदी यांनी गायलेली हजारो गाणी आजही संगीतप्रेमींच्या मनात घर करून आहेत. लतादीदी यांनी आपल्या कारकीर्दीत 36 भाषांमध्ये सुमारे 50 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. मात्र, त्यांनी कधीही मोठ्या पडद्यावर स्वरबद्ध केलेले गाणं ऐकले नाही. त्याला कारणही खास होते.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूरमध्ये झाला. लतादीदींना पहिले संगीताचे धडे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकरांकडून मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली. त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अजरामर झाली.मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या अकस्मात निधनानंतर वयाच्या तेराव्या वर्षी लतादीदींनी संगीतक्षेत्रात काम करायला सुरुवात केली.
नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक ह्यांनी मंगेशकर कुटुंबाची काळजी घेतली. त्यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला. लतादीदी यांनी सुरुवातीच्या काळात अभिनेत्री म्हणून काही चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या. त्याच दरम्यान त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती.
आपल्या गायिकेच्या जोरावर लता मंगेशकरांनी संगीत क्षेत्रावर आपली एक वेगळीच छाप उमटवली. लता मंगेशकरांनी विविध भाषांमधील 50 हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. लता मंगेशकरांना 2001 साली ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. त्या आधी त्यांना पद्मभूषण (1969), पद्ममविभूषण (1999), दादासाहेब फाळके पुरस्कार (1989) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.
भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या. मधुबाला ते प्रियांका चोप्रापर्यंत अनेक अभिनेत्रींना दिला आवाज….
लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत मधुबालापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत अनेक अभिनेत्रींसाठी गाणी गायली आहेत. त्यांनी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना आपला आवाज दिला आहे. त्यातून लता मंगेशकर यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान लक्षात येते. लतादीदी या भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या साक्षीदार होत्या. चित्रपटसृष्टीत आलेली स्थित्यंतरे त्यांनी पाहिली.