IND vs PAK मॅचवर नवं संकट! क्रिकेटप्रेमींची चिंता वाढली

सर्वांनाच उत्सुकता असलेला भारत वि पाकिस्तान सामना आज न्यूयॉर्कमध्ये रंगणार आहे. अमेरिकेमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून राहणाऱ्या भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. कारण क्रिकेट जगतातील सर्वात मोठा सामना यावेळी चाहत्यांना याची देही याची डोळा पहायला मिळणार आहे. T20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील सर्वात मोठा, लाखो चाहत्यांच्या नजरा ज्यावर खिळल्या आहेत, तो सामना आज ( रविवार, 9 जून) न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील या सामन्याबद्दल केवळ अमेरिकेतील क्रिकेट प्रेमींनाच नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पण हे थ्रिल आणि उत्साह यावर कोणी पाणी ओतलं तर सगळ्यांचाच भ्रमनिरास होऊ शकतो. या सामन्यातही असंच काहीसं घडू शकतं आणि चाहत्यांची ( भारत वि, पाक मॅच पाहण्याचीी) प्रतीक्षा आणखी वाढू शकते.या सामन्यासाठी कितीही जय्यत तयारी करण्यात आली असली तरी हे सगळं एका क्षणात उद्धव्सत होऊ शकतं आणि संपूर्ण सामनाच संकटात सापडू शकतो. याचं मुख्य कारण म्हणजे नासाऊ काऊंटीमधील वातावरण बेभरवशी आहे, त्यामुळे सामन्याबद्दल काहीही सांगता येणार नाही.

नासाऊ काउंटीमध्ये 9 जून रोजी सकाळी हवामान चांगले राहणार नाही आणि पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, नासाऊ काउंटीमध्ये सकाळच्या सुमारास पावसाची सुमारे 61 टक्के शक्यता आहे. भारतात जरी हा सामना रात्री 8 वाजल्यापासून पाहायला मिळणार असला तरी अमेरिकेत स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 पासून हा सामना सुरू होईल.

अशा स्थितीत सकाळी पाऊस झाल्यास सामन्यात व्यत्यय येऊ शकतो आणि सगळ्यांच्याच उत्साहावर पाणी पडेल.सर्वात मोठे आव्हान म्हणजे या स्टेडियममधील ड्रेनेज व्यवस्था जागतिक दर्जाची नाही. कारण हे केवळ तात्पुरते स्टेडियम म्हणून बांधण्यात आले आहे. अशा स्थितीत तेथे एवढ्या सुविधा उपलब्ध करणे आणि ते स्टेडिअम लगेच खेळण्यायोग्य बनवणे शक्य होईल का, असाच प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे. परिस्थिती जास्तच बिघडली तर हा सामना रद्द होऊ शकतो कारण लीग स्टेजमध्ये रिझर्व्ह डेचा ( राखीव दिवस) नियम नाही. त्यामुळे असंख्य क्रिकेटप्रेमींचा भ्रमनिरास होऊ शकतो.