इचलकरंजीतील कृष्णा योजनेची वितरण नलिका बदलणार

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी मध्ये पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर आहे. सतत जलनलीकेला गळती लागत असते. कृष्णा पाणी पुरवठा योजनेची गळती बाधीत मजरेवाडी ते शिरढोण पर्यंतची २७०० मिटर नलिका तातडीने बदलण्याचे काम सुरू करण्याची ग्वाही इलिकॉन एनर्जी सोल्युशन प्रा. लि. मुंबई या कंपनीचे संचालक राजेश राजगुरु यांनी दिली. तर झालेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी ६ मार्चला पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा पाणी पुरवठा योजनेच्या ५५०० मीटर वितरण नलिका टाकण्याच्या कामकाजासंदर्भात गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्यावतीने उपायुक्त तैमुर मुलाणी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. मुलाणी यांनी झालेल्या कामाचा अहवाल देण्याच्या तसेच काम मुदतीत पुर्ण न झाल्यास दंड सुनावण्यात येईल, असे स्पष्ट केले. बैठकीस महाविकास आघाडीचे शशांक बावचकर, मदन कारंडे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, नितीन जांभळे, संजय तेलनाडे, उदयसिंग पाटील, सदा मलाबादे, ताराराणी पक्षाचे सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, जलअभियंता सुभाष देशपांडे, बाजीराव कांबळे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.