इचलकरंजीत गॅस सिलेंडरचा स्फोट  

  इचलकरंजी, येथील सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनीत घरामध्ये झालेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात अण्णासाहेब अंदरघिसके आणि त्यांच्या पत्नी मनीषा अंदरघिसके हे वृद्ध दांपत्य गंभीर जखमी झाले. स्फोटाची तीव्रता इतकी होती की घरासह प्रापंचिक साहित्यासह तीन वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण घराला तडे गेले असून शेजारील व समोरील काही घरांच्या खिडक्याच्या काचा आणि टाईल्स फुटल्या आहेत. ही घटना आज पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

 याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सांगली नाकापरिसरातील वृंदावन कॉलनी येथे हनुमान मंदिराजवळ अंदरघिसके कुटुंबीय राहण्यास आहे. घराच्या तळ मजल्यावर आण्णासाहेब आणि त्यांच्या पत्नी मनीषा हे दोघे तर वरच्या मजल्यावर त्यांचा मुलगा निशांत त्याची पत्नी आणि दोन मुले राहतात. गुरुवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटाने  

 
 संपूर्ण परिसर हादरून गेला. काही क्षण कोणाला काहीच कळाले नाही. स्फोटामुळे उडालेल्या आगीच्या भडक्याने अण्णासाहेब आणि त्यांची पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. नातेवाईक व नागरिकांनी त्यांना तातडीने न उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये नेले. पण प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून या दोघांनाही सांगली सिव्हील दवाखान्यात पाठविण्यात आले.  
 
घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाणे, महसूल विभागाचे तलाठी, पुरवठा विभागाचे अधिकारी आणि संबंधित गॅस कंपनीचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करत पंचनामा केला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की घरामागे असलेले पत्र्याचे शेड, त्याचे पत्रे, भिंती पूर्णपणे ढासळल्या होत्या.घराशेजारी रिकाम्या जागेत पत्रे उडून  पडले तर संपूर्ण घराला तडे गेले आहेत. त्याचबरोबर घरातील सर्वच प्रापंचिक साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शेजारील व समोरच्या घरांचेही या स्फोटामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेने अंदर घिसके कुटुंबीय हादरून गेले होते. परिसरातील नागरिकांच्या सहाय्याने दिवसभर नुकसानग्रस्त साहित्य हलवण्याचे काम सुरू होते..